पदव्युत्तर संगणक शास्त्र व उपयोजन पदविका अभ्यासक्रमातील (पीजीडीसीएस अँड ए) विद्यार्थ्यांचे ‘बेकायदेशीर’ प्रवेश विद्यापीठाने रद्द केल्यानंतर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे.
परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात होणार असताना ऐनवेळी प्रवेश रद्द केल्याचा निर्णय घेतल्याबद्दल या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या निष्क्रिय प्रशासनाला दोष दिला आहे. विद्यापीठाने हेच पाऊल गेल्या ऑक्टोबर महिन्यात उचलले असते, तर आम्हाला दुसऱ्या अभ्यासक्रमात प्रवेश घेता आला असता असे त्यांचे म्हणणे आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कंप्युटर सायन्स अँड अ‍ॅप्लिेकशन (पीजीडीसीएस अँड ए) हा अभ्यासक्रम सध्या नागपूर विद्यापीठाच्या आयआयसीसीसह कमला नेहरू, पांडव आणि भंडारा येथील एका महाविद्यालयात चालवला जातो.
विद्यापीठाच्या इंटर इन्स्टिटय़ूशनल कंप्युटर सेंटरच्या (आयआयसीसी) ऋचा जैन, समृद्धी पाठक, मोहित गडकरी, सचिन हेडाऊ, प्रफुल्ल भिसीकर आणि विश्वजित सिंग या विद्यार्थ्यांनी त्यांना इतके महिने अंधारात ठेवल्याबद्दल विभागप्रमुख सतीश शर्मा यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दोष दिला. या लोकांनी आम्हाला पोकळ आश्वासने दिली. आम्ही गेल्यावर्षी ५ डिसेंबरलाच कुलगुरू विलास सपकाळ यांना एक पत्र दिले होते व त्याची प्रत कुलसचिव अशोक गोमासे, प्र-कुलगुरू महेश येंकी, परीक्षा नियंत्रक विलास रामटेके आणि विज्ञान शाखेचे अधिष्ठाता किशोर देशमुख यांनाही पाठवली होती, परंतु यापैकी कुणीही आमच्या तक्रारीकडे लक्ष दिले नाही, असे हे विद्यार्थी म्हणाले.
नागपूर विद्यापीठाचे अधिकारी आम्हाला कुलगुरूंची भेटही घेण्याची परवानगी देत नाहीत. वास्तविकत: एमसीए अभ्यासक्रमातील प्रवेशांबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यार्थ्यांच्या बाजूने जो निकाल दिला होता, त्याच्या आधारे आमचेही प्रवेश नियमित करण्यात येतील असे या लोकांनी आम्हाला सांगितले होते, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
पीजीडीसीएस अँड ए अभ्यासक्रमाचे विद्यार्थी त्यांच्या भवितव्याबद्दल चिंतित असून, विद्यापीठाने आम्हाला प्रवेश दिला यात आमचा काही दोष नसल्यामुळे वर्ष वाचवण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचा इरादा त्यांनी बोलून दाखवला. एखाद्या अभ्यासक्रमात प्रवेशासाठी काय निकष आहेत हे विद्यापीठाला माहीत असणे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांना हे नियम माहीत नसतील, तर त्यांना वरिष्ठ पदांवर राहण्याचा हक्क नाही अशी टीकाही त्यांनी केली.