विदर्भातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती या दोन्ही विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला असल्यामुळे आणि विद्यापीठ परीक्षांवरील एम.फुक्टो.चा बहिष्कार कायम असल्यामुळे या दोन्ही विद्यापीठात कोणत्याही परीक्षा सुरू झालेल्या नाहीत. इतकेच काय, तर प्रात्यक्षिक परीक्षा देखील पूर्णपणे पार पडलेल्या नाहीत, असा दावा एम. फुक्टो.चे उपाध्यक्ष आणि ‘नुटा’चे अध्यक्ष प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी शुक्रवारी लोकसत्ताजवळ केला आहे.
प्राध्यापकांनी घातलेल्या बहिष्काराला न जुमानता राज्यभरातील अनेक विद्यापीठाच्या परीक्षा सुरळीपणे सुरू असल्याचा जो दावा करण्यात येत आहे तो निव्वळ दिशाभूल करणारा आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद आणि नांदेड विद्यापीठातील परीक्षा कामावर त्या भागात दुष्काळ असल्यामुळे प्राध्यापकांचा बहिष्कार नाही, हे एम. फुक्टो.ने आधीच जाहीर केलेले आहे. डॉ. रघुवंशी म्हणाले की, प्राध्यापकांचे वेतन रोखणे आणि त्याच्याविरुध्द एस्माची कारवाई करण्याची धमकी सरकारने देणे अनुचित आहे. अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. दिनेश जोशी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात लोकसत्ताला सांगितले की, अमरावती विद्यापीठात ४१५ वर परीक्षा असून अडीच लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, मात्र प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे प्रश्नपत्रिकांचे मॉडरेशन अर्थात, नियमनच झालेले नाही. त्यामुळे प्रश्नपत्रिकांची छपाईसुध्दा झालेली नाही. प्रश्नपत्रिकाच तयार नसल्यामुळे परीक्षा कशा घ्याव्यात, हा विद्यापीठांसमोर प्रश्न आहे. प्रात्यक्षिक परीक्षा सुध्दा पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.
उल्लेखनीय म्हणजे, प्राध्यापकांचा समजा आज उद्या संप मिटला तरी किमान १५ दिवस तरी विद्यापीठ परीक्षा घेता येणार नाहीत, कारण प्रश्नपत्रिकांचे मॉडरेशन करावे लागेल. नंतर त्या छपाईला टाकाव्या लागतील. नागपूर विद्यापीठाचे प्र. कुलगुरु डॉ.महेशकुमार येन्की यांनी सांगितले की, विद्यापीठ परीक्षेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल.
ती बठक एप्रिल फुल ठरू नये
राज्य सरकारने विद्यापीठ परीक्षांवरील प्राध्यांपकाच्या बहिष्काराबाबत सकारात्मक भूमिका घेतली तरच काही मार्ग निघू शकेल. १ एप्रिलला राज्य सरकार एम. फुक्टो.शी चर्चा करणार आहे, अशी माहिती नुटाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी दिली. प्राध्यापक संघटनांची भूमिका नेहमीच सकारात्मक राहिली आहे. सरकार मात्र विधिमंडळात आणि प्राध्यापकांशी केलेल्या चच्रेत दिलेली आश्वासने पाळत नाही, असे सांगून डॉ. रघुवंशी म्हणाले की, शासनाने विद्यार्थी, प्राध्यापक, पालक आणि एकूणच समाजाचे हित लक्षात घेऊन दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे अन्यथा, १ एप्रिलची बठक एप्रिल फुल ठरली, अशीच प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही.
उद्या ‘नुटा’ ची बठक
प्राध्यापकांच्या बहिष्काराबाबत प्राध्यापक संघटनांची भूमिका आणि सरकारचा नकारात्मक दृष्टीकोन या संदर्भात नुटाचे माजी अध्यक्ष माजी आमदार प्रा.बी.टी. देशमुख रविवारी मार्गदर्शन करणार आहे. अमरावतीच्या केसरबाई लाहोटी महाविद्यालयात या संदर्भात प्राध्यापकांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सभेत प्रा. बी.टी. देशमुख प्राध्यापकांच्या बहिष्कार आंदोलनाचा मागोवा देखील घेणार आहेत.