आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू किंवा वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांमध्ये प्रशासन पाहणाऱ्या पदाधिकाऱ्यांची एक दिवसीय बैठक उद्या, २२ जानेवारीला वध्र्याच्या सावंगी मेघे परिसरात आयोजित करण्यात आली आहे.
वैद्यकीय क्षेत्राचा घसरत चाललेला दर्जा आणि त्यावरील उपाययोजनांच्या संदर्भात ही बैठक महत्त्वाची असल्याचे दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप गोडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय वंशाचे हाँगकॉँगमधील डॉ. निवृत्ती पाटील आणि हाँगकाँगच्या मेडिसिन विद्याशाखेचे ली का सिंग  यांचे ‘दर्जात्मक आरोग्य विज्ञान शिक्षण’ या विषयावर मुख्य भाषणे आयोजित करण्यात आली आहेत.
भारतीय वैद्यक परिषदेचे सदस्य पद्मश्री डॉ.अशोक गुप्ता, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे विविध शहरांमधील कुलगुरू डॉ. संजय ओक, कोल्हापूरचे डॉ. एस.एच. पवार, पुण्याचे डॉ. पी.एन. राजदान, प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. एस.डी. दळवी, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम, इंदोरचे डॉ. धरम लोकवानी, भोपाळचे डॉ. जी.सी. दीक्षित, डॉ. अविनाश सुपे आणि भारती विद्यापीठातील अधिष्ठाता डॉ. विवेक सावजी यावेळी उपस्थित राहतील. या राष्ट्रीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार दत्ता मेघे राहतील.
दिवसभर चालणाऱ्या या बैठकीत वैद्यकीय क्षेत्रातीत दर्जात्मक शिक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसंबंधीच्या शिफारशी भारतीय वैद्यक परिषदेला आणि महाराष्ट्र वैद्यक परिषदेला पाठवण्यात येणार असल्याचे डॉ. गोडे म्हणाले. पत्रकार परिषदेत डॉ. एस.आर. तनखीवाले उपस्थित होते.