मध्य तसेच पश्चिम रेल्वेच्या ठरावीक मार्गावर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर उतारा शोधण्यात रेल्वे प्रशासनाला पूर्णपणे अपयश आल्याने यापैकी काही स्थानकांवरील प्रवासी हळूहळू िहसक बनू लागल्याचे चित्र अगदी ठसठशीतपणे पुढे येऊ लागले आहे. तुडुंब गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या लोकलमधून खाली पडून प्रवाशांना जीव गमवावा लागल्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घडत आहेत. या घटना ताज्या असताना ठाणेपल्याडच्या काही स्थानकांमध्ये गर्दीने भरलेल्या लोकलमध्ये फलाटांवरील प्रवाशांना चढूच द्यायचे नाही, यासाठी ठरावीक प्रवाशांच्या टोळ्या तयार झाल्या असून आपला हेतू साध्य करण्यासाठी िहसक मार्गाचा अवलंब करू लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या टोळक्याला प्रतिउत्तर देण्यासाठी फलाटांवरील प्रवासीही आक्रमक होऊ लागले असून त्यासाठी लहान चाकू, सुरे, मुठीत बांधायचा ‘फायटर’ घेऊनच स्थानकात प्रवेश करू लागले आहेत. यासंबंधीची ठोस माहिती रेल्वे पोलिसांकडे उपलब्ध झाली असली तरीही प्रत्यक्ष तक्रारींची नोंद मात्र कमी होत असल्याचे चित्र आहे.   
मुंबई उपनगरात लोकल प्रवासादरम्यान प्रवाशांमध्ये होणारी भांडणे काही नवी नाहीत. लोकलची चौथी सीट मिळण्यावरून धक्काबुक्की, दारात उभे राहण्यावरून हाणामारी, धक्का लागला म्हणून शिवीगाळ हे प्रकार यापूर्वीही पाहावयास मिळाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या विरार फास्ट लोकलमध्ये चढण्या-उतरण्यावरून होणारी वादावादी तर या ‘लोकल वादाचा’ नमुनाच होता. लोकल गाडय़ांमधील ‘आतले’ आणि ‘बाहेर’च्यामध्ये होणाऱ्या वादावादीचा ‘विरार पॅटर्न’ प्रसिद्ध असला तरी पश्चिम रेल्वे स्थानकातील हे लोण हळूहळू मध्य रेल्वे मार्गावरील ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये पाहावयास मिळत असून यापैकी काही स्थानके तर हिंसक प्रवाशांचे अड्डे बनू पाहात आहेत. कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांमध्ये घडणारे हे प्रकार पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे दाखलही होत नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरदेखील प्रवाशांकडून टीका केली जाऊ लागली आहे.
पश्चिम तसेच मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरामधून सुमारे ७० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. त्यापैकी सुमारे ४० लाख प्रवासी मध्य रेल्वेने प्रवास करतात. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर प्रवाशांची संख्या कमालीची वाढली असून ठाणेपल्याडच्या स्थानकांमध्ये तर लोकलमध्ये बसायला जागा मिळणे ही पर्वणी मानली जाते. गाडय़ांची संख्या कमी पडू लागल्यामुळे क्षमतेच्या तिप्पट ते चौपट आणि कधीकधी त्यापेक्षाही अधिक प्रवासी प्रत्येक डब्यातून प्रवास करू लागली आहेत. ऐन गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढायला मिळेल याविषयीही खात्री नसते. सकाळच्या वेळेत सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि बदलापूर, अंबरनाथ, कसारा या भागांतून सुटणाऱ्या लोकल प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. या गाडय़ा कल्याण-डोंबिवली स्थानकातच भरून जातात आणि पुढे दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांमध्ये त्यामुळे प्रवाशांना लोकलमध्ये चढायलाही जागा नसते.
गर्दीला िहसक वळण
दरम्यान, कामाच्या वेळेत लोकलमध्ये साधा प्रवेशही मिळत नाही, ही भावना मुंब्रा-दिवा, कळव्यातील प्रवाशांना असह्य़ होऊ लागली असून त्यामुळे या स्थानकांमध्ये गटागटाने मारामाऱ्या होण्याचे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागले आहेत. नुकताच मुंब््रयातील काही तरुणांनी कळव्यातील प्रवाशांना लोकलमध्ये प्रवेश नाकारून पद्धतशीरपणे कळव्यातील प्रवाशांना चोपल्याचा प्रकार घडला. मुंब््रयातील तरुणांचे एक टोळके सकाळच्या वेळेत लोकलच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडत गटाने कळवेकरांना दमबाजी करत असल्याचे चित्र आता नित्याचे झाले आहे. कळव्यातील प्रवाशांच्या एका गटाने मुंब््रयातील ही दादागिरी मोडून काढण्याचा प्रयत्न दोन दिवसांपूर्वी केला आणि बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारीत झाले. लोकलमध्ये प्रवेश मिळावा यासाठी कळवा, मुंब्रा, दिवा स्थानकात काही प्रवासी मुठीत ‘फायटर’ घेऊन प्रवास करताना आढळून आल्याची माहिती याच भागातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
डोंबिवलीकरही अग्रेसर
कल्याण, डोंबिवली रेल्वे पोलीस स्थानकांमध्ये अशा पद्धतीच्या भांडणाची नोंदणी अदखलपात्र स्वरूपात केली जात असून वर्षांकाठी १५० हून अधिक घटना दाखल होत असतात. पोलीस स्थानकांमध्ये बोलवून समज देऊन अशा घटनातील आरोपींना सोडून दिले जाते. ठाण्यात मात्र अशा प्रकारची कोणतीच तसदी पोलीस घेत नसल्याचा प्रवाशांचा आरोप आहे. शिवीगाळ, मारामारी अशी भांडणे वाढू लागली असून त्यामध्ये कंबरेचा पट्टा, चेन, धारधार ब्लेड, सुऱ्या, साखळी, बांबू या घातक वस्तूंचादेखील वापर होऊ लागले आहे, असे पोलीस सूत्रांकडून कळते. काही प्रवासी बॅग, छत्री, जेवणाचा डब्बा, पाण्याची बाटली यांचा वापरदेखील दुसऱ्यांना इजा करण्यासाठी वापरतात अशी धक्कादायक माहिती आहे. दरम्यान, यासंबंधी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. जे. कदम यांच्याशी संपर्क केला असता प्रवासी वादावादीचे प्रमाण ठाण्यात कमी असून कळव्यासारखे प्रकार आमच्याकडे क्वचितच घडत असल्याचा दावा त्यांनी केला.
ठाणे शटल संख्या वाढवा..
ठाण्यापासून बदलापूर, अंबरनाथ, कर्जत, कसारा या मार्गावरील लोकलच्या मर्यादित संख्यामुळे गर्दी वाढत असून त्यामुळेच हे वाद उद्भवत असून ते रोखण्यासाठी शटलची संख्या वाढणे गरजेचे आहे. तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांच्या घोषणेप्रमाणे लोकलच्या संख्या आजदेखील वाढल्या नाहीत त्यामुळेच प्रवासी हिंसक होत आहेत. लोकलची गर्दी आणि पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे हे प्रकार दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. असे उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे नंदकुमार देशमुख यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वेमध्ये प्रवाशांकडून लुटमारीचे प्रकार घडले नाहीत. परंतु सिद्धिविनायकाच्या दर्शनाला रात्री येऊन पहाटे परत जाताना हुल्लडबाजी करीत सहप्रवाशांना त्रास देण्याचे प्रकार घडले आहेत. २०१३ मध्ये अशा ३०० हुल्लडबाज प्रवाशांना मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अटक केली होती. गेल्या मंगळवारीही अशा प्रकार हुल्लडबाजी करणाऱ्या ४६ प्रवाशांना अटक करण्यात आली होती. हे प्रवासी १६ ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. छेडछाड करणे, दरवाजावर लटकणे, महिला प्रवाशांनी छेडछाड करणे, अश्लील शेरेबाजी करणे असे प्रकार करीत असतात. याच टोळक्यामध्ये शिरून काही गुन्हेगार प्रवाशांना लुटत असतात. तशा स्वरूपाच्या तीन ते चार घटना गेल्या काही महिन्यात पश्चिम रेल्वेवर उघडकीस आल्या आहेत. असे टोळके सक्रिय असते त्याचा गैरफायदा गुन्हेगार घेतात. त्या टोळक्यात मिसळून ते प्रवाशांना लुटतात. त्यामुळे प्रवाशांमधून गुन्हेगारांना ओळखणे अवघड होते.
राजेंद्र त्रिवेदी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंबई सेट्रल रेल्वे पोलीस