ऋतू संक्रमणाच्या काळात वातावरण बदल घडून येणे, यात काही नाविन्य नाही. किंबहुना फेब्रुवारी ते मार्च या काळात पाऊस आणि वादळ हेही नवे नाही. गेल्यावर्षीसुद्धा याचदरम्यान गारपीट, वादळी वारे आणि अतिवृष्टीने हाहाकार उडवला होता. मात्र, बुधवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घोंगावणाऱ्या वादळी वाऱ्यांसह पावसाचा कहर अनेकांना हादरवून गेला. हवामानातील बदलाच्या भीषणतेचा हा परिणाम असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
थंडी कमी होऊन तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर पावसाचे येणे निश्चित आहे. थंडी जास्त असेल तर वादळी वाऱ्यांसह पाऊस येतो. यावर्षी मध्यभारतात थंडीने जवळपास सर्व विक्रम मोडीत काढले. त्यामुळे हवेतही मोठय़ा प्रमाणावर बाष्प तयार होऊन ढग तयार झाले. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडय़ात तापमानाने डोके वर काढायला सुरुवात केल्यानंतर बाष्प वितळून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. विशेषत: मध्यभारतात थंडी जास्त पडल्याने कमी दाबाचे पट्टेही तयार झाले.
बुधवारी पहाटेच्या सुमारास झालेला पाऊस हा त्याचाच परिणाम होता. पहाटे तीन वाजताच्या सुमारास घोंगावणाऱ्या वाऱ्यांचा आवाज अतिशय भयावह होता. पावसाच्या तुलनेत वादळाचे प्रमाण जास्त असल्याने शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. विजेवरही त्याचा परिणाम झाला आणि शहरातील बराचसा भाग अंधाराखाली गेला.
बुधवारी उजाडल्यानंतर अनेक चौकातील वाहतुकीचे दिवे बंद झाले होते. विदर्भापासून सुरू झालेली ही वादळी पावसाची सुरुवात हळूहळू संपूर्ण मध्यभारतात दिसून येईल. या पावसामुळे थंडीत वाढ होणार नाही, पण वातावरण ढगाळ असेल आणि सायंकाळच्या सुमारास वारा आणि पावसाचीही शक्यता आहे.
सुर्याचे उत्तरायन सुरू असल्याने ज्या भागात सूर्य डोक्यावर आहे, त्या त्या ठिकाणी असा प्रकार घडून येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

हवामान बदलाला माणूसच जबाबदार असून भविष्यात मोठे परिणाम होणार आहेत. कमी काळात अधिक पाऊस, दोन पावसातील अंतर वाढणार आहे. उष्णतेच लाटेसोबतच शीतलहरी निर्माण होणार आहेत. याची सुरुवात झाली असून हवामान बदलाचे परिणाम भारतातही दिसून येत आहेत.