मंगळवारी दुपारी वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह झालेल्या जोरदार पावसाने नाशिक शहराला अक्षरश: झोडपून काढले. त्र्यंबकेश्वरमध्ये वीज कोसळून दोन जण ठार झाले, तर इगतपुरी तालुक्यात घोटी-सिन्नर रस्त्यावरील लोखंडी कमान जमीनदोस्त झाली. कित्येक घरांवरील पत्रे उडून गेले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी लग्नमंडप उद्ध्वस्त झाले. शहरात ठिकठिकाणी शेकडो झाडे व फांद्या कोसळल्या. त्याखाली सापडून वाहनांचे नुकसान झाले. वीजवाहिन्या तुटल्याने व खांब वाकल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. वृक्ष उन्मळून पडल्याने काही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. केवळ अर्धा ते पाऊण तास झालेल्या वादळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. या वेळी गारांचाही मारा झाल्याने शहरवासीयांची एकच तारांबळ उडाली. अग्निशमन विभागाची यंत्रणा तातडीने कार्यप्रवण झाली. कोसळलेल्या झाडांची संख्या इतकी होती, की सर्व ठिकाणी लगेचच पोहोचून मदतकार्य सुरू करणेही अवघड झाले.
मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात उकाडय़ाचे प्रमाण प्रचंड वाढले होते. टळटळीत ऊन व उष्मा या दोन्हींचा मारा सहन करणाऱ्या नाशिककरांना मंगळवारी वादळी पावसाने तडाखा दिला. दुपारी बारा वाजेपर्यंत पाऊस होईल असे वातावरण नव्हते; परंतु नंतर तासाभरात आकाशात ढग जमा झाले आणि दुपारी दोनच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले. काही वेळाने पावसाला सुरुवात झाली. अवघ्या काही मिनिटांत गारांचा सडा पडू लागल्याने नागरिकांना सुखद धक्का बसला बसला. बच्चे कंपनीने भर पावसात गारा वेचण्यासाठी धडपड केली. साधारणत: अर्धा तास चाललेल्या पावसाने रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टी भागातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्या. गंगापूर रोडवर चार ते पाच ठिकाणी झाडे कोसळली. महापौरांच्या रामायण बंगल्यासमोरील झाडाच्या फांद्या तुटल्या. महापालिकेच्या राजीव गांधी भवनमधील वाहनतळातील झाडही कोलमडले. शरणपूर रस्त्यावरील एका दुकानावर झाड कोसळले, तर सीबीएसजवळ आदर्श शाळेसमोरील रस्त्यावर मारुती कारवर झाड कोसळल्याने एका बाजूची वाहतूक बंद झाली. हुतात्मा स्मारकाजवळ कोसळलेल्या झाडाखाली रिक्षा दबली गेली. अंबडच्या एक्स्लो पॉइंट चौकात झाड कोसळल्याने तीन खांब वाकले. त्र्यंबक रस्ता व पंचवटी भागातही अनेक ठिकाणी झाडे कोसळली. त्याखाली वाहने सापडून मोठे नुकसान झाले. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, दुचाकी वाहनांना मार्गक्रमण करणे अवघड बनले. चारचाकी वाहनधारक दिवे लावून कसेबसे मार्गस्थ होत होते. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडवून दिली. शहरातील गंगापूर रोड, पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर आदी भागांत रस्त्यांवरील अनेक झाडे वा त्यांच्या फांद्या तुटल्या. त्याखाली सापडून जसे वाहनांचे नुकसान झाले, तसेच वीजवाहिन्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. वीज खांबही वाकले गेले. परिणामी, अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. झाडे कोसळल्याने व वीजपुरवठा ठप्प झाल्यामुळे अग्निशमन व महावितरणची यंत्रणा कार्यप्रवण झाली. अग्निशमन विभागाकडे इतक्या तक्रारी आल्या की, त्यांची सोडवणूक करता करता पथकाची दमछाक झाली. या तक्रारींमध्ये प्रामुख्याने झाडे उन्मळून पडल्याच्या अधिक तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. कोसळलेली झाडे बाजूला करण्याचे आव्हान या दलासमोर होते. त्यांची संपूर्ण यंत्रणा वेगवेगळ्या भागांतील तक्रारींचा निपटारा करण्यात लागली होती. ‘कटर’च्या साहाय्याने झाड अथवा फांदी विलग करण्याचे काम दलाचे जवान युद्धपातळीवर करत होते. वादळी वाऱ्याने झोपडपट्टय़ांमध्ये वास्तव्यास असलेल्या अनेक कुटुंबांचे संसार उघडय़ावर आले. घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे आतील साहित्यही भिजले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची यंत्रणा कामाला जुंपली. नुकसान मोठे असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत अनेक भाग अंधारात राहिल्याचे निदर्शनास आले. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. उकाडय़ापासून काही अंशी मुक्तता मिळाल्याने शहरवासीयांना दिलासा मिळाला.

सिन्नर-घोटी महामार्गावर कमान जमीनदोस्त
इगतपुरी तालुक्यात तासभर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने सिन्नर-घोटी महामार्गावरील लोखंडी कमान कोसळल्याने शिर्डीकडे येणारी व जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली. अनेक लग्न-मंडप उद्ध्वस्त झाले. इगतपुरी, घोटी, टाकेद, साकूर, शेणीत, पिंपळगाव मोर, धामणी, धामणगाव, काकुस्ते या भागांस पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसाने घोटी बाजारपेठेत व्यावसायिक व ग्रामस्थांची धावपळ उडाली. पावसाने टोमॅटोच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असून वांगे, कारले व इतर भाजीपाल्यांसह आंब्याचे मोठे नुकसान झाले. अनेक भागांत वीजपुरवठाही खंडित झाला.

त्र्यंबकेश्वरमध्ये वीज पडून दोन ठार
त्र्यंबकेश्वर येथे वीज कोसळून दोन जण जागीच ठार झाले. त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या गोरक्ष मठ परिसरात ही घटना घडली. मठातील सहकाऱ्यांनी तातडीने धाव घेऊन संबंधितांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हे दोघेही बंगाली भाषिक असून त्यांची नावे समजू शकली नाहीत.