नैसर्गिक आपत्तीच्या फेऱ्यात सापडलेल्या नाशिकसह धुळे जिल्ह्यातील काही भागात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे पुन्हा हजारो एकरवरील पिकांचे कोटय़वधींचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी याआधीची नुकसानभरपाई मिळाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी पिकांना बसला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी १८८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. कळवण, सटाणा व निफाड तालुक्यात पावसाने पिकांचे सर्वाधिक नुकसान केले आहे.
वर्षभरापासून उत्तर महाराष्ट्रास नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. डिसेंबर महिन्यात नाशिकमध्ये अवकाळी पाऊस व गारपीट झाली, यामुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली होती. त्या धक्क्यातून शेतकरी सावरला नसताना फेब्रुवारीच्या सुरुवातीला पुन्हा हे नवीन संकट कोसळले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार कळवण तालुक्यात ९५ मिलीमीटर, सटाणा ३१, येवला ८, दिंडोरी ३, मालेगाव १३, सिन्नर ११, निफाड २६ मिलीमीटर पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका निफाडच्या देवगाव, अभोणा, कनाशी, दळवट, ताहराबाद आदी गावांतील पिकांना बसला. काही ठिकाणी गारपीटही झाली. द्राक्ष, कांदा, गहू आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. सध्या द्राक्ष काढणीचे काम वेगात सुरू आहे. तसेच लाल कांदाही काढला जात आहे. शेतात मेहनत करून हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून उमटत आहे. एकटय़ा निफाड तालुक्यात दीड हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला आहे. काही विशिष्ट भागात पिकांचे मोठे नुकसान झाले. बुधवारी सकाळपासून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून ठिकठिकाणी पाहणी करून नुकसानीची माहिती घेतली जात आहे. अवकाळी पावसाचा गहू पिकाला मोठा फटका बसला. प्राथमिक अंदाजानुसार हजारो हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.
नाशिकप्रमाणे धुळे जिल्ह्यास पावसाचा तडाखा बसला. धुळे शहरासह जिल्ह्य़ाला अवकाळी वादळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले. त्यात रब्बी हंगामाचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. काही भागांत हलका, तर काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रब्बीतील दादर, गहू, फरदड कपाशीसह अन्य पिके, तसेच फळबागायतदारांना फटका बसला. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडाले, तसेच झाडे उन्मळून पडली. वरखेडी शिवारात आनंदा सूर्यवंशी आणि राजू माळी यांचा गहू व मका पीक वादळी पावसाने भुईसपाट झाले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाटबंधारे विभाग उपविभागीय अधिकारी गुण नियंत्रक उपविभाग कार्यालयावर वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळून नुकसान झाले. त्यात कार्यालयाच्या छताची कौले तसेच टेबल, पंखा आणि कपाटाची मोडतोड झाली आहे. साक्री तालुक्यास गारपिटीचा सर्वाधिक तडाखा बसला. पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.