उन्हाच्या झळा सोसणाऱ्या नाशिक जिल्ह्याला सोमवारी पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी पावसाने दणका दिला. निफाड, सिन्नर, सटाणा, देवळा, इगतपुरी तालुक्यांमध्ये पाऊस झाला. काही भागात गारपीटही झाल्यामुळे पिकांच्या नुकसानीची मालिका अव्याहतपणे सुरू आहे. पावसाने वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला.
अधूनमधून सातत्याने होणारा अवकाळी पाऊस आणि गारपीट यानंतर उत्तर महाराष्ट्राची पावले उन्हाळ्याच्या दिशेने पडू लागली असतानाच एप्रिलच्या मध्यावर अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकरी वर्गाची चिंता वाढविली आहे. थंड हवेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या नाशिकचे तापमान ४० अंशावर पोहोचण्याच्या मार्गावर असल्याने उकाडा चांगलाच जाणवत होता. जानेवारीपासून सातत्याने हजेरी लावणाऱ्या अवकाळी पावसाने या महिन्यात ही प्रक्रिया कायम ठेवली. सोमवारी सकाळपासून अनेक भागात ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. देवळा, निफाड, सिन्नर, सटाणा आणि लगतच्या काही भागात अचानक सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. देवळा तालुक्यात भऊर, विढेवाठी, खामखेडा, मटाणे, वाजगाव आदी ठिकाणी वादळी पावसाने तर भऊर व खामखेडा परिसरात गारपीट झाली. निफाड तालुक्यास पुन्हा पावसाने झोडपून काढले. कुंभारी, नांदुर्डी, शिरवाडे वणी भागात गारपीट झाल्यामुळे पिकांचे पुन्हा नुकसान झाले. सटाणा तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट झाली. काही विशिष्ठ भागात गारांचे प्रमाण अधिक असले तरी काही भागात पावसाने अर्धा ते पाऊण तास हजेरी लावली.
काही मिनिटांत सर्वत्र गारांचा सडा पडल्याचे दिसू लागले. यामुळे नागरिकांनाही सुखद धक्का बसला असताना बच्चे कंपनी लगेच त्या वेचण्यासही सरसावली. पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडवून दिली. अवकाळी पावसाने द्राक्षबाग, कांदा, गहू, डाळिंब, टोमॅटो अशा सर्व पिकांचे आधीच मोठे नुकसान झाले आहे. आधीच्या संकटातुन बचावलेली पिके नव्याने येणाऱ्या आपत्तीत सापडत असल्याची शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आहे. ऐन उन्हाळ्यात वारंवार पाऊस होत असल्याने शेतीचे सर्व गणित विस्कटले आहे. इगतपुरी तालुक्यात दोन तास पावसाने झोडपले. टोमॅटो व काकडीच्या बागांचे नुकसान झाले. घोटी बाजार समितीत कृषीमाल विक्रीला आलेल्या शेककऱ्यांचे पावसाने नुकसान केले. मातीमोल भावात भिजलेल्या मालाची त्यांना विक्री करावी लागली. इतर बाजार समितीमध्ये कांद्यासह अन्य कृषीमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गारांसह झालेल्या बेमोसमी पावसाचा फटका आंबा पिकालाही बसला. अनेक झाडांच्या कैऱ्या गळून पडल्या. दुसरीकडे पावसाने काही दिवसांपासून जाणवणारा उकाडा कमी झाल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
शहर व परिसरात दुपारी हलक्याशा सरी झाल्या. पण वातावरणात कमालीचे खाली आले. आसपासच्या भागात झालेला पाऊस आणि गारपिटीचा हा परिपाक असल्याचे अधोरेखीत झाले. नाशिकप्रमाणे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान केले.