उरण तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका करंजा येथील मच्छीमार बोटींनाही बसला आहे. होळीपूर्वी मच्छीमार बोटी किनाऱ्यावर विसावल्याने बोटीत पाणी शिरून अपघात होऊ नये याकरिता बोटींच्या लाकडी फळ्यांना लावण्यात येत असलेले तेल सुकण्यापूर्वीच वाहून गेल्याने अडीचशेहून अधिक मच्छीमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मच्छीमारांनाही नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मच्छीमार संघटनांकडून केली जात आहे.
वातावरणातील बदलामुळे करंजा बंदरातील दोनशे ते अडीचशे मच्छीमार बोटी बंदरात नांगरण्यात आलेल्या होत्या. उन्हाळा सुरू झाला की या कालावधीत अनेक बोटींची डागडुजी करण्याचे काम हाती घेण्यात येते. त्यासाठी बोटींच्या फळ्यांमध्ये असलेल्या कापसाला भेग जाऊ नये याकरिता तसेच बोटीला वापरण्यात आलेले सागाचे लाकूड टिकून राहावे याकरिता बोटीची चोपडण केली जाते. यामध्ये करडईचे तेल व चंद्रुस (मेणाचा पदार्थ)यांचे मिश्रण करून बनवलेले तेल बोटीच्या फळीला तसेच दोन फळ्यांमधील कापसाला लावले जाते त्यामुळे कापसातून गळती होत नाही. या तेलामुळे सागाच्या लाकडाचे वाळवीपासून संरक्षण होत असते. बोटींच्या या डागडुजीकरिता एका बोटीला किमान ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. करंजा बंदरात उभ्या असलेल्या अडीचशेपेक्षा अधिक मच्छीमारांचे बोटींचे या अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे, अशी माहिती करंजा येथील पारंपरिक मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सीताराम नाखवा यांनी दिली. या मच्छीमारांना शासनाच्या मच्छीमार विभागाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मासळीच्या दरवाढीचा फटका
होळी हा सण मच्छीमारांच्या सणापैकी एक मोठा सण म्हणूनच साजरा केला जातो. होळीच्या दिवशी मच्छीमार आपल्या बोटी हार, फुले, पतका तसेच साडयांनी सजवितात. यावेळी प्रथेनुसार मान म्हणून बोटीच्या समोरच्या भागात (नाळीला) भला मोठा मासा लावून बोटीवरच वाजतगाजत कुटुंबासह होळी साजरी केली जाते. त्यानंतर हा मासा काढून तो प्रसाद म्हणून गावातील नातेवाईकांना वाटण्याची प्रथा आहे. मात्र मागील अनेक मासळीचे प्रमाण कमी होऊन मासळी महाग झाल्याने व सध्या अशा माशांची किंमत २५ ते ३० हजारावर गेल्याने करंजा तसेच रेवस परिसरातील मच्छीमारांची ही प्रथा महागाईमुळे बंद झाल्याची माहिती करंजा मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी दिली आहे.