यंदा मान्सूनचे आगमन वेळेत होण्याचे संकेत हवामान खात्याने दिले आणि त्याचा अनुभव नागपूरकरांनी शुक्रवारी घेतला. मान्सूनची चाहूल देणाऱ्या पावसाने दुपारी १२ वाजताच जोरदार धडक दिली. पाऊस अनपेक्षित नसला तरी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने अवघ्या नागपूरकरांची दाणादाण उडवली. दरम्यान, काही ठिकाणी झाडे, फलक पडण्याच्या घटना घडल्या तर बजाजनगर परिसरात अपघात होऊन युवती गंभीर जखमी झाली.
हवामान खात्यासह तज्ज्ञांनीसुद्धा गुरुवारपासून मुसळधार पावसाचे संकेत दिले होते. गुरुवारी रात्री हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. शुक्रवारी सकाळपासूनच पावसाळी वातावरण होते, पण दुपारी १२ वाजताच्या सुमारास आकाशात काळया ढगांनी एकच गर्दी केली आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटांनी सुमारे दोन तास शहर दणाणून गेले.
दरम्यान, शहरातील अनेक भागात झाडे कोसळून तारा तुटल्याच्या घटना घडल्या, तसेच जाहिरातीची मोठमोठी कापडी फलके फाटली तर लोखंडी फलके पडली. नरेंद्रनगर पुलाखाली अवघ्या काही क्षणातच पाणी साठून तळे तयार झाले.
हिंगणा रोड, राज्य राखीव पोलीस दलाचे कार्यालय, बजाजनगर, जयताळा रोड, त्रिमूर्तीनगर अशा शहरातील अनेक भागात आणि रस्त्यांवर पावसाचे तळे साचले होते. धुव्वाधार पावसामुळे वाहनचालकांना काहीच दिसत नव्हते त्यामुळे मिळेल तिथे त्यांनी आडोसा शोधला. रस्त्यावर किमान गुडघाभर पाणी साचल्याने अनेक वाहनधानकांची वाहने रस्त्यातच बंद पडली.
पाऊस अपेक्षित असला तरी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेषत: सीताबर्डी परिसरात फुटपाथवरील किरकोळ विक्रेत्यांची यात चांगलीच अडचण झाली. अमरावती मार्गावर सर्वाधिक पाऊस कोसळला. दरम्यान, वाडी परिसरात वीज कोसळल्याची अफवाही उडाली. तरुणाईने मात्र मान्सुनच्या आगमनाची सूचना देणाऱ्या या पावसाला चांगलेच ‘एन्जॉय’ केले.