गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रविकांत चौधरी यांच्यावर अविश्वास ठराव दाखल झाला असून, १८ पैकी १२ सदस्यांनी ठरावावर सह्य़ा केल्या आहेत. बुधवारी (दि. १३) समितीच्या विस्तारित मार्केट यार्ड उद्घाटनात राष्ट्रवादीच्या नेत्यांना डावलल्यामुळेच हा ठराव दाखल केल्याचे स्पष्ट झाले. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी हा ठराव दाखल करण्यात पुढाकार घेतला.
जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल ठरावात सभापती चौधरी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कापूस, सोयाबीन व इतर धान्याच्या बाजार शुल्कात तोटा, भाजीपाला शुल्क वसुलीत अनियमितता, समितीच्या स्थलांतराबाबत चालढकल आदी आरोप ठेवून ठराव दाखल केला आहे. ठरावावर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब निरस, पांडुरंग सोळंके आदींच्या सह्य़ा आहेत. शुक्रवारी दाखल केलेल्या या ठरावासंदर्भात शनिवारी डॉ. केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. समिती सदस्य राजू लोडा, सोमाणी, जि.प.चे माजी सभापती शिवाजी निर्दुडे आदी या वेळी उपस्थित होते.
चौधरी ४ वर्षांपूर्वी भाजपच्या सहकार्याने सभापती झाले. त्यानंतरच्या काही वर्षांत गंगाखेड तालुक्यात मोठे राजकीय बदल झाले. डॉ. मधुसूदन केंद्रे भाजपमधून राष्ट्रवादीत आले, तरीही चौधरी सभापतिपदावर कायम राहिले.
गंगाखेड शहराबाहेर विस्तारित मार्केट यार्ड होत आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. १३) होत आहे. या उद्घाटन समारंभासाठी लोकसभेतील भाजपाचे उपनेते गोपीनाथ मुंडे, शिवसेना खासदार गणेश दुधगावकर, आमदार सीताराम घनदाट, रामप्रसाद बोर्डीकर, संजय जाधव व मीरा रेंगे, उद्योजक रत्नाकर गुट्टे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, नगराध्यक्षा अलका चौधरी, रिपाइंचे नेते अ‍ॅड. गौतम भालेराव, शेकापचे राज्य खजिनदार लक्ष्मणराव गोळेगावकर, माजी आमदार सुरेश देशमुख, पाशा पटेल, अ‍ॅड. विजय गव्हाणे आदींना निमंत्रित केले आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नेत्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवले. हेच मुख्य कारण अविश्वास ठरावाचे असल्याचे बोलले जाते.