‘सहत्व, ममत्व, एकत्व आणि देवत्व’ असे अनंतरावांचे व्यक्तिमत्व होते. देवत्व याचा अर्थ रूढार्थाने नाही, तर माणसांचे संघटन घडवून आणणाऱ्या या माणसांचा प्रेमळ स्वभाव भावला. अनंतराव केवळ पत्रकार नव्हते, तर ते उत्तम साहित्यिक होते, हेच पदोपदी जाणवत राहते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी व्यक्त केले.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीत अनंत भालेराव यांच्या पुतळ्याचे अनावरण बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.   अनंतरावांचा फारसा सहवास लाभला नसल्याचा उल्लेख भाषणात सुरुवातीलाच करून कर्णिक म्हणाले की, हा माणूस पत्रकार होताच, पण त्यांची लिहिण्याची शैली अभ्यासल्यावर ते साहित्यिक असल्याचेच दिसून येते. ‘मांदियाळी’ पुस्तकातील त्यांची भाषा अभ्यासल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पलू समोर येतात.
मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रास्ताविकात १९८६नंतर केलेल्या कामाचा उल्लेख करीत मराठवाडा साहित्य परिषदेने बाळसे धरल्याचा दावा केला. अनंतरावांनी मसापसाठी एक हजार रूपयांत जागा उपलब्ध करून दिली. त्याचा उल्लेख मी तपासला असल्याचे सांगून त्यांच्यामुळेच ही जागा मिळाल्याचे कबूल करतो, असे सांगत पुतळा उभारणीस आíथक सहकार्य केल्याबद्दल अनंतरावाचे चिरंजीव अशोकराव यांचे आभार मानले. अशोक भालेराव यांनी या पुतळ्याचे अनावरण कर्णिक यांच्या हस्ते झाले, याचे समाधान असल्याचे सांगितले.
मसापमधील अनंत भालेराव भवन या इमारतीवरील नाव पुसले गेल्यानंरत ते पुन्हा टाकण्याबाबत मसापच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली टाळाटाळ आणि ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर उभारलेल्या या पुतळ्याचे अनावरण गेले काही दिवस लटकलेलेच होते. अखेर ते गुरुवारी झाले. व्यासपीठावर माजी न्या. नरेंद्र चपळगावकर, ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ, रा. रं. बोराडे, दादा गोरे यांची उपस्थिती होती.