मराठवाडय़ास हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठविला जात असताना नगर-नाशिकमधून मात्र जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विरोध दर्शवून अन्याय केला जात आहे. अशा वेळी पालकत्वाची भूमिका न घेणारे नगर-नाशिकचे पालकमंत्री नकोतच, अशी जोरदार मागणी गुरुवारी येथे आयोजित बैठकीत करण्यात आली. पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेचा या वेळी निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेल्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण संनियंत्रण समितीच्या (जेएनएनयूआयएम) बैठकीत प्रामुख्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांनी मंत्री थोरात यांच्यासह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनाही टीकेचे लक्ष्य केले. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस वैजापूरचे आमदार आर. एम. वाणी, महापौर कला ओझा, उपमहापौर संजय जोशी, सभागृह नेते सुशील खेडकर, गटनेता गजानन बारवाल, नगरसेवक समीर राजूरकर आदींबरोबरच निवासी जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, जिल्ह्य़ातील विविध नगरपालिकांचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.
मराठवाडय़ासाठी वरच्या भागातील धरणांमधून २२ टीएमसी पाणी सोडण्याची मागणी असताना जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मात्र केवळ साडेनऊ टीएमसी पाणी सोडण्याची घोषणा केली. नगर जिल्ह्य़ातील निळवंडे धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यास सुरुवात झाली असली, तरी प्रत्यक्षात मात्र हे पाणी तेथील कालव्यांमध्ये वळविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हक्काच्या पाण्याबाबत मराठवाडय़ाच्या जनतेची दिशाभूल केली जात असताना पालकत्वाची भूमिका निभावण्याऐवजी पालकमंत्री थोरात मात्र सोयीस्कर मौन बाळगून आहेत. त्यामुळे असे पालकमंत्री या पुढे नकोतच, अशी आग्रही मागणी या बैठकीत आमदार वाणी, उपमहापौर जोशी तसेच खेडकर, बारवाल आदींनी केली. शहरातील रखडलेल्या समांतर पाणी योजनेबाबत आता राज्यपालांनाच साकडे घालण्याचे या वेळी ठरले.