दूरचित्रवाणी विश्वात सध्या जमाना टॅलेंट हंटचा असून त्यावर आधारित रिअ‍ॅलिटी शोज् विशेष लोकप्रिय आहेत. मात्र शेकडा ९९ टक्के रिअ‍ॅलिटी शोज्मधील कार्यक्रम हे बॉलीवूडमधील नाच-गाण्यांवर आधारित असतात ही वस्तुस्थिती आहे. त्या अर्थाने रिअ‍ॅलिटी शोज् हे बॉलीवूडची एक तर भ्रष्ट नक्कल करतात अथवा त्या व्यासपीठावरून नव्या सिनेमांची चक्क जाहिरात केली जाते. उपवन आर्ट फेस्टिव्हलमधील टॅलेंट हंट वैशिष्टय़पूर्ण अशासाठी की कोणत्याही स्पर्धकांनी चित्रपटांवर आधारित कलाकृती सादर करू नये, ही या स्पर्धेची अगदी प्राथमिक अट होती. त्यामुळे या स्पर्धेस कसा काय प्रतिसाद मिळेल, याबाबत आयोजकांच्या मनातही थोडी साशंकता होती, पण निरनिराळ्या कला प्रकारात तब्बल ४५० स्पर्धकांनी भाग घेऊन अभिजात कलेस अजूनही उज्ज्वल भवितव्य आहे, हेच सिद्ध केले आहे.  
गायन (शास्त्रीय व सुगम), वादन (मेलडी आणि ऱ्हिदम), नृत्य (शास्त्रीय व लोक) अशा एकूण सहा प्रकारच्या कला प्रकारांचा या स्पर्धेत समावेश आहे. ११ ते १६, १७ ते २५ आणि त्यापुढील अशा तीन वयोगटांत ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेची प्राथमिक फेरी २० आणि २१ डिसेंबर रोजी शिवाईनगरमधील संस्कार स्कूलमध्ये घेण्यात आली.
त्यातून अंतिम फेरीसाठी ८८ स्पर्धकांची निवड झाली असून १० ते १२ जानेवारी दरम्यान महोत्सवातील एका खास व्यासपीठावर हे कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या सर्व सहा प्रकारच्या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेत्यास अनुक्रमे दहा आणि सात हजार रुपये रोख, तसेच स्मृतिचिन्ह असे पारितोषिक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील सर्वोत्तम सादरीकरणाला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार आहे. चित्रपटीय कलेस थारा नसणारी ही ठाणे परिसरातील आजवरची सर्वात मोठी स्पर्धा आहे, अशी माहिती या उपक्रमाचे समन्वयक श्रीपाद भालेराव यांनी दिली. अंतिम फेरीत विविध कला प्रकारातील दिग्गज कलावंत परीक्षक म्हणून काम पाहणार असल्याने या स्पर्धेतून खऱ्याखुऱ्या गुणवत्तेचा शोध घेतला जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.