उपवन आर्ट फाऊंडेशनतर्फे १० ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत ठाण्यात उपवन तलावाच्या परिसरात तीन दिवसांच्या भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवास ठाणे महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांचेही सहकार्य लाभले आहे.
सकाळी १० ते रात्री १० या वेळेत होणाऱ्या या महोत्सवात  ‘परफॉर्मिग आर्ट’ या विभागात उस्ताद झाकीर हुसेन, उस्ताद रशिद खान, डॉ. एल. सुब्रमण्यम, यू. श्रीनिवास, व्ही. सेल्वागणेश, रूपकुमार राठोड, राकेश चौरसिया तसेच जपानमधील लिओनार्ड एटो आदी मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत. ‘व्हिज्युअल आर्ट्स’ या कार्यक्रमाअंतर्गत सुधीर पटवर्धन, सुनील गावडे, शर्मिला सामंत, प्राजक्ता पोतनीस, जिजी स्कारिआ, अ‍ॅन परकोको आणि अन्य चित्रकारांच्या चित्रांचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे.
महोत्सवात फाइन आर्ट, पारंपरिक कला, पाककला, दृश्य आणि डिजिटल कला, शिल्पकला, लोककलांचेही सादरीकरण होणार असून यात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील कलाकार सहभागी होणार आहेत. याच ठिकाणी विविध  उत्पादनांचे ३०० स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. तसेच देशभरातील विविध प्रांतांच्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या संगीत व नृत्यविषयक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘वॉल इज द स्क्रीन’ या संकल्पनेअंतर्गत जर्मनीतील काही कलाकार आणि तंत्रज्ञ रसिकांच्या आवडीची छोटीशी फिल्म भींतीवर दाखविणार आहेत.
अरुणकुमार हे या महोत्सवाचे अध्यक्ष असून संदीप कर्नावट हे निमंत्रक आहेत. महोत्सवाला भेट देणाऱ्या रसिकांसाठी बस गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी ९०२२६९४२४२/९०२२१३१६१९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.