गुन्हेगारीच्या विश्वाबद्दल सर्वसामान्यांना कुतूहल असते. त्यामुळेच गुन्हेगारीविषयक कथा, कादंबरी आदी साहित्य वाचकप्रिय ठरते. साहित्याप्रमाणेच या विषयावरील चित्रपट आणि मालिकाही खूप लोकप्रिय होतात. हिंदी चित्रपटात या अंडरवर्ल्डचा थरार येऊन गेला असला तरी मराठीत तो फारसा आलेला नाही. आता लवकरच ‘सॅटरडे संडे’ या मराठी चित्रपटातून गुन्हेगारी विश्वाचा हा थरार पाहायला मिळणार आहे.
सध्या ‘सीआयडी’, ‘क्राइम पॅट्रोल’, ‘सावधान इंडिया फाइट्स’, ‘पोलीस डायरी’ या हिंदीत तर मराठीत ‘लक्ष्य’, ‘अस्मिता’ या मालिका सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सादर झालेल्या ‘एक शून्य शून्य’, ‘परमवीर’ या मराठी तर हिंदीतील ‘करमचंद’ या मालिका गाजल्या होत्या.
मराठी चित्रपटात अपवाद वगळता ‘अंडरवर्ल्ड’ फार मोठय़ा प्रमाणात आलेले नाही. ‘सॅटरडे संडे’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने गुन्हेगारी विश्वाचा चेहरा प्रेक्षकांसमोर येणार आहे.  अश्विनी राहुल एंटरप्रायजेस्च्या अश्विनी शिरसाट यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन मकरंद देशपांडे यांचे आहे.
चित्रपटाची घोषणा मुंबईत नुकतीच एका कार्यक्रमात करण्यात आली. या वेळी चित्रपटातील कलाकारांनी या चित्रपटातील एका थरारक प्रसंगाचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास अमोल गुप्ते, अभिषेक कपूर, निशिकांत कामत, उमेश शुक्ल आदी दिग्दर्शक,  अभिनेता विनित शर्मा, अभिनेत्री सई ताम्हणकर, गायक-संगीतकार मिलिंद इंगळे आणि चित्रपटाशी संबंधित अन्य कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
गुन्हेगारी विश्वातील ‘शार्प शूटर’ पोलिसांच्या रडारवर येतात. सोमवारचा सूर्योदय पाहायचा असेल तर आपापसातील शत्रुत्व बाजूला सारून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी एकत्र या, असा निरोप येतो.
निरोप दस्तुरखुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांच्या सचिवाकडून येतो आणि त्यानंतर चित्रपट उलगडत जातो. चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारित असल्याने चित्रपटात मारधाड व संघर्ष मोठय़ा प्रमाणात असणार आहे.
दीपक आणि विक्रम दहिया यांनी चित्रपटातील साहस दृश्ये दिग्दर्शित केली आहेत. चित्रपटात स्वत: मकरंद देशपांडे यांच्यासह मुरली शर्मा, नेहा जोशी, अमृता संत, असीम हट्टंगडी आदी कलाकार आहेत.