News Flash

विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अंधारात ठेवल्याने तीव्र नाराजी

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या आयोजनात विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अंधारात ठेवण्यात आल्याने ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व शासकीय यंत्रणा ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये

| February 14, 2013 01:17 am

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या आयोजनात विदर्भ वैधानिक विकास मंडळाला अंधारात ठेवण्यात आल्याने ज्येष्ठ सदस्य अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सर्व शासकीय यंत्रणा ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये सहभागी असल्याचे सांगण्यात आले असले तरी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. संवैधानिक दर्जा प्राप्त झालेल्या आणि विदर्भ विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक असलेल्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाला ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या आयोजनाबाबत आजतागायत अंधारात ठेवण्यात आले आहे. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ आयोजनामागील उद्देश, त्याचे स्वरूप, तयारी, कुठल्या विषयांवर चर्चा होणार आहे आदी कुठल्याच बाबतीत मंडळाला प्रत्यक्षात माहिती देण्यात आलेली नाही. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च नव्हे तर राज्याने नवे औद्योगिक धोरण आखले त्याचीही माहिती अद्याप मंडळाला प्राप्त झालेली नाही. अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांनी आज मंडळातील कर्मचाऱ्यांना ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’बद्दल माहिती मागितली असता यासंदर्भात काहीही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
नाराजीच्या पाश्र्वभूमीवरच विदर्भाला स्वस्त दराने मुबलक वीज पुरवठा तसेच वन जमीन कायद्यात सूट या दोन बाबींशिवाय ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ यशस्वी होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन अ‍ॅड. मधुकरराव किंमतकर यांनी केले. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये सांगोपांग चर्चा होऊन विदर्भ विकासाचा मार्ग निघू शकतो, असे ते म्हणाले.  
विदर्भात उद्योग मोठय़ा प्रमाणात यावेत, यासाठी दोन बाबींची नितांत गरज आहे. योग्य दरात विजेची उपलब्धता हा कोणत्याही औद्योगिक उत्पादनाच्या खर्चाचा महत्त्वाचा भाग असतो. विदर्भाच्या शेजारील छत्तीसगडमध्ये भरपूर प्रमाणात वीज विदर्भापेक्षाही कमी दरात उपलब्ध आहे. त्यामुळे तेथे उद्योगांचे प्रमाणही जास्त आहे. विदर्भात उद्योग मोठय़ा प्रमाणात यावेत, यासाठी विदर्भात हेच करण्याची गरज आहे. मोठय़ा प्रमाणात वीज विदर्भातच तयार होते. तरीही विजेअभावी विदर्भाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. शेती सिंचनाच्या वापरासाठी असलेले पाणी वीज निर्मितीसाठी दिले जाते. त्यामुळे विदर्भात ३ लाख हेक्टर सिंचन कमी झाले आहे. हजारो एकर शेत जमीन वीज प्रकल्पासाठी वापरली जात आहे. या प्रकल्पांच्या सभोवतालच्या पीक व लोकांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो आहे. याच्या मोबदल्यात स्वस्त दरात वीज हा विदर्भाचा अधिकार आहे. विदर्भात तयार वीज उद्योगांसाठी विदर्भातच वापरली तर मोठय़ा प्रमाणात वीज वितरण हानी (ट्रान्समिशन लॉसेस) वाचेल. त्यासाठी वीज स्वस्त दरात मिळायला हवी, याकडे किंमतकर यांनी लक्ष वेधले.
विदर्भात विशेषत: औद्योगिकदृष्टय़ा मागासलेल्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्य़ात उद्योग आणायचे असतील तर वन जमीन कायद्यात (१९८०) सूट मिळायला हवी. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे ९० टक्के खनिज संपत्ती एकटय़ा विदर्भात आहे. पण त्यावर आधारित उद्योग काढायचे झाल्यास या कायद्यात सूट दिल्यासच उद्योग येऊ शकतील. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये चर्चा होऊन विदर्भ विकासाचा मार्ग निघू शकेल. पण, त्याआधी त्याचे त्याचे प्रारूप तयार व्हायला हवे, असे स्पष्ट मत किंमतकर यांनी व्यक्त केले.  
प्रयत्न जुनेच – आमदार फडणवीस
विदर्भ वैधानिक विकास मंडळाला डावलण्याचे प्रयत्न जुनेच असल्याची घणाघाती टीका आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. आताही उशीर झालेली नाही  ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये मंडळाला सन्माने सहभागी करून घ्यावे, असे ते म्हणाले. विदर्भ वैधानिक विकास मंडळाला  ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या आयोजनात डावलले गेल्याचे उघड झाले. या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, विदर्भ वैधानिक विकास मंडळाला डावलण्याचा सरकारचा प्रयत्न आजचा नाही. तो जुनाच आहे. विदर्भाच्या विकासासाठी हे मंडळ महत्त्वाचे केंद्र आहे. गेल्या काही वर्षांत यासाठी हे मंडळ सक्रिय राहिले. त्यामुळे विदर्भाचा पैसा सरकारला द्यावा लागला. या कारणाने सरकार विदर्भ वैधानिक विकास मंडळाला डावलण्याचा नेहमीच प्रयत्न करते, असा आरोप फडणवीस यांनी
केला.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 1:17 am

Web Title: upsetness because neglecting the vidharbha science development mandal
Next Stories
1 शहरातील विकास कामांसाठी निधी मंजूर करण्याची जनहितार्थ याचिका
2 महिला उत्कर्ष अभियान आता गावागावात
3 आजपासून ग्रंथ व साहित्य महोत्सव
Just Now!
X