पालकमंत्री राजेंद्र मुळक यांच्याविषयी नाराजी ठेवणाऱ्यांची संख्या वाढत असण्याच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्र्यांना आव्हान देण्याच्या भूमिकेत आलेल्या राष्ट्रवादीच्या भूमिके कडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, राजकीय कौशल्यात अपुरे ठरत असल्याचा आरोप झेलणारे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी त्यांच्याविषयी असलेल्या नाराजीवर सूचक मौन ठेवून होणारे आरोप लोकसत्ताशी बोलतांना फे टाळून लावले.    
जिल्ह्य़ातील कांॅग्रेस वर्तुळात खासदार दत्ता मेघे व राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्यातील वितुष्ट नवनवे वळण घेत आहे. जाहीर टीकाटिपण्णी होऊ लागली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील समजल्या जाणारे पालकमंत्री मुळक यांच्या भूमिकेने कांॅग्रेसच्या गटबाजीला एक नवा कोन जुळला आहे. लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असणाऱ्या सागर मेघेंचे मेहुणे म्हणून पालकमंत्री मुळकांच्या प्रत्येक निर्णयावर राजकीय वर्तुळ लक्ष ठेवून आहे. मेघे गटाला अनुकुल निर्णय घेत असल्याचा आरोप कांबळे गटाकडून होत असतांनाच आता राष्ट्रवादीनेही मुळकांना लक्ष्य केले. राकॉ व या पक्षाचे सहयोगी आमदार प्रा.सुरेश देशमुख यांच्या गटाने पालकमंत्र्यांविषयी असलेला असंतोष व्यक्त केला नव्हता. मात्र, पालकमंत्र्यांच्या महाराष्ट्र दिनाच्या उपस्थितीत झालेल्या सर्व कार्यक्रमावर आमदार देशमुख व राकॉंच्या जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी बहिष्कार टाकून असंतोष जाहीर केला. ही बाब लोकसत्ताने निदर्शनास आणताच मुळक समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली. या वृत्तांची दखल घेऊन मुळक यांनी आमदार देशमुख यांच्याशी तत्परतेने संपर्क साधला. भेटीची गळ घातली. भेट घडली. भेटीत आमदार देशमुख यांनी नाराजी उघड करण्याचे टाळल्याचे समजले. मात्र, पालकमंत्री मुळक यांनी या संदर्भात बोलतांना स्पष्ट केले की, आमदार देशमुख यांच्यासोबत आपण संपर्क केला. भेट झाली, हे खरे आहे. पण, त्यांनी कुठलीच नाराजी दर्शविली नाही.
जिल्हा बॅंकेच्या पॅकेजबाबत मी खोडा घातलेला नाही. विविध समित्यांवरील नियुक्त्या झाल्या असून सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा आपला प्रयत्न आहे, असा खुलासा मुळक यांनी लोकसत्ताशी बोलतांना केला. जिल्हा राष्ट्रवादीने विविध समित्यांवरील पक्ष कार्यकर्त्यांच्या नेमणुका रखडण्यामागे पालकमंत्र्यांनाच  जबाबदार धरले आहे. महाराष्ट्र दिनाच्या पक्ष कार्यालयातील कार्यक्रमात ही बाब ठसठसीतपणे पुढे आली. मुळकांवरील नाराजीचा सूर असा तीव्र होत आहे. पक्षांतर्गत गटबाजीत काहीसा हतबल झालेला मेघे गट पालकमंत्री मुळक आल्याने सुखावला. मात्र, आता कांबळे गटाने सहा महिन्यांपासून पालकमंत्र्यांवर शरसंधान सुरू केले आहे. पक्षाच्या कार्यक्रमास पालकमंत्री सहकार्य करीत नसल्याचा आरोप जिल्हा कांॅग्रेस जाहीरपणे करीत आहे. वचनपूर्ती मेळाव्याच्या पूर्वसंध्येला तर जिल्हा कांॅग्रेस समितीने सहकार्य करण्याबद्दल पालकमंत्र्यांशी वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराची जंत्रीच सादर केली आणि गटबाजीचा बार उडवून दिला. एकीकडे पक्षांतर्गत, तर दुसरीकडे मित्रपक्षानेही नाराजीचे सूर मोठे केल्याने पालकमंत्री मुळक सध्या चर्चेत आले आहेत. प्रथम कांॅग्रेसच्या जिल्हा कार्यालयात भेट देऊन त्यांनी पदाधिकाऱ्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. आता राकॉंच्या नाराजीचे सूर लोकसत्तातून उमटताच आमदार देशमुखांशी सुसंवाद निर्माण करण्याचे पाऊल टाकले. मेघे गटाशी असणाऱ्या घनिष्टतेतून ही नाराजी प्रकटल्याची चर्चा एकीकडे असतांनाच पालकमंत्री म्हणून राजकीय कौशल्य दाखविण्यात मुळक कमी पडतात, असाही सूर ऐकायला मिळतो.