कलावंत आणि रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे गेल्या वर्षी पदार्पणातच मुंबईतील काळा घोडा महोत्सवाशी स्पर्धा करणाऱ्या ठाण्यातील उपवन कला महोत्सवाचे दुसऱ्याच वर्षी दिवाळे वाजले आहे. अभिजात कलांच्या या संमेलनात आपल्या प्रसिद्धीची पोळी भाजून घेण्याच्या ठाण्यातील विविध राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीमुळे आधीच महोत्सवाच्या आयोजनातून कलावंत मंडळींनी अंग काढून घेतले होते. त्यात यंदा प्रायोजकांनीही हात आखडता घेतल्याने महोत्सवाचे आर्थिक गणित जुळणे अशक्य झाले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच ठाण्यात उपवन कला महोत्सव आयोजित करण्याचा बेत पूर्णपणे बारगळला आहे. 

यंदा जानेवारी महिन्यातच तीनऐवजी चार दिवस कला महोत्सव भरविण्याचे ठरले होते. त्यासाठी ८ ते १२ जानेवारीचा मुहूर्तही ठरला होता. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलावंतांच्या तारखांनुसार दोन महिने आधीच त्यांचा होकार मिळवण्यात आला होता. या नियोजित कार्यक्रमांची माहिती असणारी सचित्र पुस्तिकाही तयार होती. मात्र, आर्थिक गणित जुळेनासे झाल्याने हा महोत्सव दुसऱ्याच वर्षी अडचणीत आला आहे.
बांधकाम व्यावसायिक आणि विकासकांनी गेल्या वर्षी या महोत्सवात मोठय़ा प्रमाणात प्रायोजक म्हणून योगदान दिले होते. मात्र मालमत्ता विक्रीसाठी या महोत्सवाचा फारसा फायदा होत नसल्याने यंदा विकासकांनी महोत्सवाकडे सपशेल पाठ फिरवली आहे.
या महोत्सवातून फक्त उपवन परिसरातील शिवाईनगर, शास्त्रीनगर, पोखरण, वर्तकनगर आदी परिसरातील विकासकांचाच फायदा होईल. इतरांना त्याचा काय फायदा, असा सवाल एका बांधकाम व्यावसायिकाने उपस्थित केला. त्यात पहिल्याच वर्षी अपेक्षापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाल्याने मुंबईतील काळा घोडा फेस्टिव्हलप्रमाणे कॉर्पोरट क्षेत्रातून चांगला आर्थिक सहकार्य मिळेल, अशी आयोजकांची अपेक्षा होती. मात्र तीही फोल ठरली.

राजकीय अस्थिरतेचा फटका
ठाण्याचा कला महोत्सव उपवनलाच का, असा संकुचित प्रश्न उपस्थित करत काही राजकीय नेत्यांनी हा महोत्सव एकाच वेळी ठाण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्याचा आग्रह धरला. त्यामुळे कलेवरील निस्सीम प्रेमापोटी एकत्र आलेली मंडळी महोत्सवापासून दूर गेल्याचे सांगण्यात येते.

पैशाचे सोंग आणता येत नाही
राजकीय वादांमुळे नव्हे तर पैशाचे गणित न जुळल्याने उपवन कला महोत्सव पुढे ढकलण्यात आला. कारण या कला महोत्सवास कॉर्पोरेट जगतातून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात विकासकांनीही यंदा हात आखडता घेतला. शिवाय महापालिकेकडूनही अपेक्षित आर्थिक सहकार्य मिळाले नाही. चार दिवसांच्या महोत्सवासाठी सहा ते साडेसहा कोटी रुपयांचे बजेट होते. त्यात गेल्या वर्षीची काही देणी चुकती करणे बाकी आहे. त्यामुळे आर्थिक तजवीज करून दिवाळीत हा महोत्सव केला जाईल.
-संदीप कर्नावट, समन्वयक,
उपवन आर्ट फेस्टिव्हल

बिल्डरांनी हात आखडता घेतला
उपवन महोत्सवाला गेल्या वर्षी मोठय़ा प्रमाणावर बिल्डरांनी मदत केली होती. मात्र, यंदा बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याने त्यांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे आर्थिक गणित जमत नसल्याने हा महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. हा महोत्सव ऑक्टोबर किंवा दिवाळीत आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासंबंधी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यासोबत प्राथमिक चर्चाही झाली आहे.
-सुधाकर चव्हाण, स्थानिक नगरसेवक