26 February 2021

News Flash

उरणच्या आमसभेत समस्यांचा पाऊस

उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी नगरपालिकेच्या राजीव गांधी टाऊन हॉल येथे उरण तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमसभा घेण्यात आली.

| August 14, 2015 12:39 pm

 

उरण पंचायत समितीच्या वतीने गुरुवारी नगरपालिकेच्या राजीव गांधी टाऊन हॉल येथे उरण तालुक्यातील जनतेच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आमसभा घेण्यात आली. या सभेत तालुक्यातील जनतेने नेहमीच्या सभांप्रमाणे विविध समस्यांचा पाऊसच पाडला. या आमसभेला काही शासकीय अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने जनतेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  उरणचे आमदार शिवसेनेचे मनोहर भोईर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी उरण पंचायत समितीची पहिली आमसभा घेण्यात आली. या सभेत प्रामुख्याने वाहतूक कोंडी, विजेचा लपंडाव, अपघात, पाणीटंचाई, रस्त्यातील खड्डे, अवजड वाहतूक, शेतकऱ्यांचे प्रश्न, पोलीस विभाग, ग्रामपंचायतीमधील नागरी सुविधांचा अभाव आदी समस्या मांडण्यात आल्या. यावेळी उरण तालुक्यातील ९०० पेक्षा अधिक असलेल्या अपंग व्यक्तींना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधा दिल्या जात नाहीत याकडे लक्ष वेधण्यात आले.  तसेच अपंगांसाठी शिबिरे भरवून अपंग असल्याचे दाखले देण्याचीही मागणी यावेळी करण्यात आली.सभेच्या सुरुवातीला वर्षभरात निधन पावलेल्या नेते व समाजातील व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ज्या ज्या व्यक्तींनी विविध क्षेत्रात उज्ज्वल कामगिरी बजावली, अशा व्यक्तींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आमदार मनोहर भोईर यांनी मांडला. तर कामकाजाचा आढावा उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय.एम.प्रभे यांनी घेतला.आमसभेत मांडण्यात आलेल्या समस्या सोडविण्यासाठी आपण अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करू, असा निर्धार आमदार भोईर यांनी व्यक्त केला. यावेळी उरणमधील जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 12:39 pm

Web Title: uran aam sabha
Next Stories
1 बेकायदा बांधकामे तोडण्यास शेकापचा विरोध
2 दिघ्यातील अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा
3 सफाई कामगारांचेही ‘पोटमजूर’
Just Now!
X