केवळ सुट्टीच्या दिवशी सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या उरण शहरातील वाहतूक कोंडी आता वाढून ती आठवडय़ातील संडे टू मंडे अशी आठवडाभर झाली आहे.  या संदर्भात अनेकदा निर्णय घेऊन नगरपालिका तसेच वाहतूक विभागाने पार्किंगचे फलक लावूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने तसेच शहरातील वाहतूक विभागाचे पोलीस गर्दीच्या वेळी बघ्याची भूमिका घेत असल्याने उरणमधील नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर उपाययोजना म्हणून नगरपालिकेने उरणच्या बाजारपेठेत वाहनांना बंदी घातली असून त्याकरिता बॅरेकेड्स लावण्यात आलेले आहेत.   
 शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उरण पोलीस, वाहतूक विभाग तसेच नगरपालिका यांच्या अनेक बैठकांमध्ये उत्तम चर्चा झाली, मात्र त्याची गेल्या अनेक वर्षांत अंमलबजावणी न झाल्याने शहरातील वाढत्या वाहनसंख्येबरोबर वाढत्या बेशिस्तीमुळेही वाहतूक कोंडीच्या समस्येने उग्र स्वरूप धारण केलेले आहे. शहरात अनेक ठिकाणी चारचाकी वाहने उभी करून समोरील दुकानात खरेदी करणे, एखादे वाहन अडकून पडल्यानंतर ते बाहेर निघण्याची वाट न पाहता दुचाकी तसेच चारचाकी वाहन मध्येच घुसविणे या बेशिस्तीबरोबरच वाहतूक विभाग तसेच नगरपालिकेने तयार केलेल्या पार्किंगमध्ये वाहन उभे न करणे आदी कारणांमुळे वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे.  या संदर्भात उरण नगरपालिकेचे नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी उरण शहर तसेच बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे मत करीत बाजारपेठेत वाहनांना बंदी घालण्यासाठी बॅरेकेड्स बसविण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.