दर शनिवार-रविवारी उरण तालुक्यातील खेडय़ापाडय़ांपासून शहरांपर्यंत क्रिकेटच्या स्पर्धा भरविल्या जात असून त्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जात आहेत. मात्र क्रिकेटच्या खेळापेक्षा त्याचा बाजारच अधिक मांडला असून सामन्यात विजयासाठी हातमिळवणी करून लाखो रुपयांची बक्षिसे मॅच फिक्सिंग करून वाटून घेतली जात आहेत. त्यासाठी येथील उद्योजक, राजकारणी यांनीच खतपाणी घातल्याने खेळातून खेळाडूंप्रमाणेच खिलाडूवृत्ती निर्माण होण्यापेक्षा जुगारीच निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ब्रिटिशांनी भारतीय जनतेच्या नसानसात क्रिकेट भरून ठेवले आहे. क्रिकेटने देशाला एक भारतरत्नही दिला आहे. क्रिकेटच्या सामन्यांना साधरणत: ऑक्टोबर महिन्यापासून सुरुवात होऊन ते मे महिन्याच्या मध्यापर्यंत खेळले जातात. क्रिकेटमध्ये आपल्या मुलाने नाव कमवावे, त्याने भारतीय संघातून खेळावे अशी स्वप्ने अनेक पालक पाहतात. त्यासाठी मेहनतही घेतात. मात्र यामध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतक्यांनाच यश मिळते. खेळाच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराच्याही संधी प्राप्त होतात. मात्र क्रिकेटमध्ये खेळ आणि स्पध्रेऐवजी बाजारच अधिक मांडला असल्याचे मत उरणमधील एका क्रिकेट प्रशिक्षकाने व्यक्त केले आहे. राजकीय पक्षांच्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्ताने नाइट क्रिकेटचा धूमधडाका उडविला जातो. या स्पर्धेसाठी एक लाख ते पाच-सहा लाखांची पहिल्या क्रमांकाची पारितोषिके ठेवण्यात येतात. मात्र या स्पर्धेसाठी प्रवेश फीसुद्धा त्याच तोलामोलाची असते. त्यामुळे जेवढी बक्षिसाची रक्कम तेवढीच प्रवेश फी अधिक असल्याने बहुतेक स्पध्रेतील बक्षिसे प्रवेश घेणाऱ्या क्रिकेट संघाकडूनच वसूल केली जात आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटच्या स्पर्धा या नफा कमाविण्याचे साधन बनू पाहत आहेत. त्याचप्रमाणे  दुसरीकडे मोठी बक्षिसे आपल्यालाच मिळावी यासाठी अंतिम सामन्यात मॅच फिक्सिंगही केली जात असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे क्रिकेट सामन्यांचा खेळ आणि खेळाडूंपेक्षा बाजारच अधिक मांडल्याची जोरदार चर्चा आहे.