द्रोणागिरी नोडमधील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावरीस रक्कम घेऊन सोमवारी पंपाचे दोन कर्मचारी  शेजारील जेएनपीटी कामगार वसाहतीत असलेल्या एसबीआय बँकेत भरणा करण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना या कर्मचाऱ्यांना नवघर पुलावर गाठून मागून एकाच मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी डोळ्यात मसाला टाकून मागे बसलेल्या शिपायाच्या हातून रोख रकमेची बॅग हिसकावून पोबारा केला आहे.
ही घटना दुपारी साडेअकरा ते बारा वाजता उरण-पनवेल रस्त्यालगत घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या घटनेत पंपाचे दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.बॅगेत सुमारे आठ लाखांची रक्कम असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नेहमीप्रमाणे पंपाचे सुपरवायझर सागर गडकरी मोटारसायकलवरून शिपाई यशवंत भोईर याला घेऊन नवघर पुलावरून जेएनपीटी कामगार वसाहतीतील बँकेत रक्कम भरणा करण्यासाठी जात होते. त्याच वेळी पुलावरील उरण पनवेल रस्त्याजवळ असलेल्या गतिरोधकाजवळ मोटारसायकलचा वेग कमी झाला असता मागून एका मोटारसायकलवरून आलेल्या तिघांपैकी एकाने सागरच्या डोळ्यात मसाला फेकला व मोटारसायकलवर मागे बसलेल्या शिपायाच्या हातून इतरांनी रक्कम असलेली बॅग हत्यारांचा धाक दाखवून हिसकावून घेत पोबारा केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. उरण पोलीस याचा अधिक तपास करीत असल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी दिली असून तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सावंत करीत आहेत.