महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांचे सातबारा उतारे ऑनलाइन करण्याची घोषणा केली असून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना थेट ऑनलाइन उतारा मिळणार आहे. उरण तालुक्यातील महसूल विभागाचेही ऑनलाइनचे काम आटोक्यात आलेले असून येत्या १ एप्रिलपासून उरणमधील शेतकऱ्यांना ऑनलाइन उतारे मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती उरण महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे तलाठी कार्यालयातील शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबणार असल्याने शेतकऱ्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
शेतकरी व त्यांच्या वारसांना विविध कामांसाठी सातबाराच्या उताऱ्याची आवश्यकता असते. त्यासाठी खेडय़ातील शेतकऱ्यांना शहरातील तलाठी कार्यालय गाठावे लागते. अनेकदा तलाठी जागेवर नसल्याने एका सातबाराच्या उताऱ्यासाठी तीन ते चार फेऱ्या माराव्या लागतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसेही खर्च होत आहेत.  उताऱ्याची माहिती संकलित करून त्याचा डाटा तयार करण्यात येणार असून ते पुण्यातील महसूल विभागाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली. तसेच सध्याच्या मोबाइलमधील नेटच्या सुविधेमुळे मोबाइलवरही सातबाराचा उतारा उपलब्ध होणार आहे.उरण तालुक्यातील २६०० हेक्टर जमीन असलेल्या ६० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तालुक्यातील सिडकोने ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांचेही सातबारे या योजनेद्वारे उपलब्ध होणार आहेत.