समुद्राच्या भरती-ओहोटीसाठी असलेले नैसर्गिक मार्ग विकासाच्या नावाने मातीचा भराव करून बंद केले जात असल्याने याचा फटका उरण, पनवेल तालुक्यांतील समुद्रकिनाऱ्यांना तसेच येथील भातशेतीलाही बसला आहे. पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी या भागाचा पाहणी दौरा केला असता या दौऱ्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
उरण तालुक्यातील खोपटे ते पनवेलमधील केळवणे या समुद्रकिनाऱ्यावर भात शेतीचे संरक्षण करण्यासाठी खारलँड विभागाकडून बांधाची देखरेख केली जाते. मात्र मागील अनेक वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष झाल्याने संरक्षक बांध कमकुवत झाले आहेत. दर १५ दिवसांनी समुद्राला येणाऱ्या भरतीमुळे याचा फटका येथील शेकडो एकर शेतजमिनीला बसत आहे. शेतात एकदा समुद्राचे पाणी शिरले की, शेतीत तीन वर्षे पीक येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ही स्थिती उरण व पनवेल परिसरात विकासाच्या नावाने या विभागातील पाण्याच्या नैसर्गिक वाटा बुजविल्या जात असल्याने होत आहे, अशा तक्रारी येथील शेतकऱ्यांनी केल्या होत्या.
याची माहिती मिळताच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी उरणमधील नुकसानग्रस्त विभागाची पाहणी केली. भाजपचे नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर व महेश बालदी हेही यावेळी उपस्थित होते.  गेल्या आठवडाभरात झालेल्या भरतीमुळे उरणच्या नागाव पिरवाडी, करंजा, मोरा तसेच केगांवमधील किनारे भरतीच्या महाकाय लाटांनी उद्ध्वस्त झाले. किनाऱ्यालगत असलेल्या भातशेतीचे संरक्षण करणारे बांधही तुटले गेले आहेत. त्यामुळे उरण तसेच पनवेल तालुक्यातील अनेक गावातील शेतीचे तसेच घरांचेही नुकसान झाले आहे. याची पाहणी मेहता यांनी यावेळी केली. त्यांनी कळंबुसरे, वशेणी आदी गावांच्या खाडीकिनारीही भेट दिली व परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी मेहता यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे येथील एका कार्यक्रमात सांगितले.