किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी कोणतीच उपाययोजना अनेक वर्षांत करण्यात न आल्याने तसेच महाकाय लाटांमुळे पर्यटकांचे आकर्षण असलेला उरण तालुक्यातील नागाव पिरवाडी समुद्रकिनारा उद्ध्वस्त होत आहे. या किनाऱ्यावरील अनेक झाडे उन्मळून पडत आहेत. त्याचा ग्रामस्थ व त्यांच्या शेतीलाही धोका निर्माण झाला आहे. दरम्यान  याची गंभीर दखल महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने घेतली असून तातडीने ३ कोटी ६५ लाखांच्या कामाची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांसह पर्यटकांनाही दिलासा मिळाला आहे.
नागावचा समुद्रकिनारा हा मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलसह रायगड जिल्ह्य़ातील पर्यटकांना खुणावतो असतो.  शेकडो पर्यटक नागाव किनाऱ्यावर येत असतात. सुट्टीच्या दिवशी तर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे येथील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध झाला आहे. अनेकांनी मुंबईतील तसेच इतर ठिकाणच्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सही बांधली आहेत. समुद्राच्या लाटांमुळे या किनाऱ्यांची गेली अनेक वर्षे धूप होत आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी, फोफळींची झाडे उखडून पडत आहेत. या लाटांमुळे किनाऱ्यावरील स्मशानभूमीही आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. किनाऱ्याची धूप वाढू लागल्याने नागाव परिसरातील समुद्रकिनाऱ्यावरील गोडय़ा पाण्याच्या विहिरींवरही परिणाम होऊ लागला आहे. तसेच येथील शेतीतही खारे पाणी शिरू लागल्याने शेती उत्पादनावरही परिणाम होतआहे. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड तसेच इतर संस्थांशी पत्रव्यवहार करून नागाव किनाऱ्याच्या सुरक्षेसाठी धूपप्रतिबंधक बंधारा बांधावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी ग्रामस्थांनी आंदोलनही केले होते.