उरण शहरातील रस्त्यांवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात उरण नगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे शहरातील रस्ते मोकळे झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.  
उरण शहरातील वाढता व्यापार उद्योग तसेच नागरीकरणामुळे लोकसंख्येत व वाहनांतही वाढ झाली आहे. नगरपालिकेने तीस ते चाळीस मीटर लांबीचे बनविलेले रस्ते येथील नागरिक आणि व्यावसायिकांनी कोणत्या ना कोणत्या कारणांने व्यापून टाकले होते. त्यामुळे हे रस्ते अरुंद होऊन त्याचा परिणाम रोजच्या वाहतूक कोंडीत झाला होता. उरण शहरात वास्तव्य करणारे तसेच शहरात विविध कामानिमित्ताने ये-जा करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत अनेक तक्रार आल्यानंतर नगरपालिकेने त्याची दखल घेत याबाबत कारवाई करण्याचा निर्णय नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत घेण्यात आला. त्यानुसार शहरातील पालवी रुग्णालय ते कामठा मार्गावर प्रथम कारवाई करण्यात आली. तसेच उरण करंजा रस्त्यावरील अतिक्रमणावरही नगरपालिकेचा हातोडा पडला आहे. त्यामुळे उरण शहरातील रस्ते मोकळे झाले आहेत. टप्प्याटप्प्याने ही कारवाई केली जाईल, अशी माहिती उरणचे नगराध्यक्ष गणेश शिंदे यांनी दिली आहे. नगरपालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांकडून आनंद व्यक्त केला जात आहे. अशाच प्रकारची कारवाई नगरपालिकेने संपूर्ण शहरात राबवावी, अशी मागणी उरणवासीयांकडून केली जात आहे.