उरण तालुक्यात एकही सुसज्ज असे रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांनी नवी मुंबई, पनवेल अथवा मुंबईची वाट धरावी लागत आहे. वेळेवर उपचार न झाल्याने अनेक रुग्णांना दवाखान्यात जाण्यापूर्वी जीव गमवावा लागत आहे.   परिसराला नागरी तसेच वैद्यकीय सुविधा पुरविण्याची जबाबदारी सिडकोची आहे. त्यामुळे तालुक्यात सुसज्ज रुग्णालयाची उभारणी केली जावी, अशी मागणी सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या उरण तालुक्यात तीस खाटांचे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय आहे. यापकी १५ खाटा महिला, तर १५ खाटा पुरुषांसाठी राखीव आहेत. ग्रामीण भागात कोप्रोली व िवधणे येथे जिल्हा परिषदेची दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. मात्र शासकीय निधीवर चालणाऱ्या या रुग्णालयांची दुरवस्था आहे. अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार करणे परवडत नसल्याने ते शासकीय रुग्णालयांचा रस्ता धरतात. मात्र या रुग्णालयात औषधे बाहेरून आणावी लागतात. शस्त्रक्रियेची व्यवस्था नाही. रुग्णांची संख्या वाढल्यास जादा खाटांची व्यवस्था नाही. गर्भवती महिलांची या रुग्णालयात मोठी गर्दी असते. अनेकदा प्रसूती झालेल्या महिलांना लाद्यांवर बिछाने टाकून झोपावे लागते, असे चित्र आहे. अपघातानंतर तातडीने उपचार करण्याचीही कोणतीच सोय नसल्याने वेळेत योग्य ते उपचार न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर काहींना अपंगत्व आले आहे. या अत्यंत मूलभूत अशा नागरी सुविधेकडे  सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. जेएनपीटी बंदराच्या कामगार वसाहतीत कोटय़वधी रुपये खर्च करून उभारलेले रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात जेएनपीटीचे कर्मचारी तसेच त्यांच्या नातेवाईकांशिवाय उपचार करण्याची परवानगी नाही.बंदराच्या कामगार वसाहतीतील रुग्णालयाचे अत्याधुनीकरण करून हे रुग्णालय उरणमधील सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील व कार्याध्यक्ष भूषण पाटील यांनी केली आहे.