उरणच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जेएनपीटी बंदरातील भारत पेट्रोलियमच्या लिक्विड जेट्टीजवळ रविवारी संरक्षित जातीचा समुद्री कासव जखमी अवस्थेत आढळला होता. या कासवाला उरणमधील सर्पमित्रांनी वन विभागाच्या मदतीने पकडून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करून त्याला जीवदान देऊन पुन्हा एकदा समुद्रात सुखरूप सोडण्याचे काम केले आहे. या कासवाची लांबी अडीच फुटांची आहे, अशाच प्रकारचा एक कासव काही दिवसांपूर्वी उरणच्या समुद्र किनारी सापडला होता. त्यालाही जीवदान देऊन समुद्रात सोडण्यात आले होते.
जेएनपीटीच्या लिक्विड जेट्टीजवळ काम करणाऱ्या कामगारांना रविवारी हा कासव दिसला. तो जखमी असल्याचे लक्षात येताच कामगारांनी कासवाला समुद्रातून बाहेर काढून उरणमधील सर्पमित्र विवेक केणी तसेच राजेश नागवेकर यांच्याशी संपर्क साधला. या दोघांनीही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कासवाची माहिती दिली. त्यानंतर कासवाला घेऊन पशुवैद्यकीय दवाखान्यात त्याच्यावर उपचार करण्यात आले. कासवाच्या उजव्या पायाला गंभीर जखम झालेली होती. कासवावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्याला करंजा येथील समुद्रात सोडण्यात आले आहे.