मुंबई विभागातील एसटी महामंडळाचे सर्वाधिक नफा कमावणारे तसेच दररोज २६ हजारापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणारे उरण आगार विविध समस्यांनी ग्रासले असून अस्वच्छ पाणी, शौचालयांची दुरवस्था, आगारातील अस्वच्छता यामुळे आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये सुधारणा कराव्यात अशी मागणी येथील प्रवाशांकडून केली जात आहे.
उरणच्या एसटी आगाराने मागील वर्षांच्या तुलनेने यावर्षी तब्बल ३० लाखांचा अधिक व्यवसाय केला आहे. मागील वर्षी आगाराने एक कोटी ५६ लाखांचा व्यवसाय केला होता. यावर्षी यामध्ये वाढ होऊन एक कोटी ८६ लाखांचा आतापर्यंतचा व्यवसाय केला आहे. दररोज ४९८ फेऱ्या मारणाऱ्या एस.टी.च्या बसेसमधून दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र प्रवाशांना ज्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करून देणे गरजे आहे.
तशा दिल्या जात नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उरण एसटी आगारातून सध्या महाराष्ट्रातील प्रमुख शहर व जिल्ह्य़ांसाठीही बसेस सोडण्यात येत असल्याने लांबचा प्रवास करणारे प्रवासीही या आगारातून प्रवास करीत असल्याने त्यांच्यासाठी सुविधांचा अभाव आहे.
या संदर्भात उरण एसटी आगाराचे प्रमुख डी.एस. कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता आगारातील प्रवाशांना सुविधा पुरविण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. यामध्ये शौचालयाचे कंत्राटीकरण करणे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करणे, पार्किंगची व्यवस्था सुधारणे आदी प्रस्ताव आहेत. लवकरच त्याला मंजुरी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.