मान्सूनच्या पावसाने आगमनाचे संकेत दिल्याने पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी उरण तहसील कार्यालय सज्ज झाले आहे. त्यानुसार मंगळवारी उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांनी उरण तालुक्यातील विविध आस्थापनांतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनाची आखणी सुरू केली आहे. उरण पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या या बैठकीसाठी वीज, रस्ते, वाहतूक, महसूल, पोलीस, गावागावांतील सरपंच, लोकप्रतिनिधी, उरण नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग घेतला होता.
या बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच येत्या काही दिवसांत उरण तहसील कार्यालयाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा नियोजन आराखडा तयार करण्यात येऊन आराखडय़ाच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांना आपत्तीच्या वेळी कोणती दक्षता घ्यावा यासाठी बचाव कार्याचे प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. हे प्रशिक्षण तालुका व जिल्हा पातळीवरही देण्यात येणार असल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवी पाटील यांनी दिली आहे.