हवामान खात्याने मान्सूनच्या आगमनाचे संकेत दिलेले असले तरी, उरण परिसरातील जनतेला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात केवळ आठवडाभर पुरेल इतकाच साठा उपलब्ध असून बारवी धरणातून मिळणारे पाणी लघू पाटबंधारे विभागाचे असल्याने त्यावरही नियंत्रण येण्याची शक्यता असल्याने पाणीपुरवठा बंद होऊन उरणमध्ये पाणी टंचाईचे संकट येण्याची शक्यता एमआयडीसीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरवर्षी हवामान खात्याकडून मान्सूनच्या आगमनाचे भाकीत वर्तविले जाते. मात्र ते खरे ठरतेच असे नाही, त्यामुळे हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सूनचे आमगन न झाल्यास पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.उरण तालुक्याला पाणीपुरवठा करण्यासाठी साठ वर्षांपूर्वी रानसई येथे एम.आय.डी.सी.ने धरण बांधलेले आहे. या धरणाची क्षमता १० दशलक्ष घनमीटर इतकी आहे. मागील साठ वर्षांत रानसई धरणात गाळ साठल्याने धरणाच्या क्षमतेत घट झाली आहे. तर दुसरीकडे मात्र उरण तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिकीकरण यामुळे पाण्याच्या मागणीत वाढ झालेली आहे.
पाण्याचा मागणीचा ताळमेळ साधण्यासाठी एम.आय.डी.सी. ठाण्यातील लघू पाटबंधारे विभागाच्या बारवी धरणातून काही पाणी घेते, तर वेळ पडल्यास नवी मुंबईच्या हेटवणे धरणातीलही पाणी घेऊन त्याचा पुरवठा केला जातो. सध्या रानसई आणि बारवी या दोन्ही धरणातील पाणी एकत्रित करून त्याचा पुरवठा केला जात असल्याची माहिती एमआयडीसीचे साहाय्यक अभियंता ए. एम. खडकीकर यांनी दिली आहे. तर उरणमधील पाणी पुरवठय़ात वाढ व्हावी याकरिता एमआयडीसीने दहा ते बारा वर्षांपूर्वीच धरणाची उंची वाढवून गाळ साफ केल्यास दुप्पट क्षमतेने पाणी रानसईमधूनच उपलब्ध होईल त्यामुळे उरण तालुक्यातील पाणी समस्याच दूर होईल. असे असले तर वनखात्याची परवानगी न मिळाल्याने हे काम रखडले आहे. याचा परिणाम उरणमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्यास कारणीभूत ठरणार आहे.