पारंपरिक व्यवसाय म्हणून खेडय़ापाडय़ांत तसेच शहरात डोक्यावर प्लास्टिक तसेच स्टीलची भांडी असलेले गाठोडे घेऊन फिरणाऱ्या महिला जुन्या कपडय़ाच्या बदल्यात नवीन भांडी विक्रीचा व्यवसाय करीत असून या महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागत आहे. मात्र तरीही पुरेसा व्यवसाय होत नसून नफाही होत नसल्याने घर चालविणे कठीण होऊन बसल्याची खंत या कष्टकरी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. ओझे घेऊन फिरणाऱ्या या महिलांसमोर  सध्याच्या महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या परिस्थितीत सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
डोक्यावर गाठोडे घेऊन जुन्याच्या बदल्यात नवीन भांडी घ्या भांडी म्हणून ओरडत फिरणाऱ्या महिला घरातील जुने कपडे घेऊन त्या बदल्यात नवीन भांडी देतात. या व्यवसायात महिलांची संख्या मोठी असून महिलांनी आपल्या संरक्षणासाठी एकत्रित फिरणे पसंत केले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्याची बदलती परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी महिला विक्रेत्यांवर शेरेबाजी करून त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहणारे असल्याने या महिलांनी स्वसंरक्षणाचीही रणनीती तयार केली आहे. त्याकरिता एकत्रित जाऊन व्यवसाय केला जात आहे.
त्यानंतर दुपारी न्याहरीसाठी एकत्रित जमून विसावा घेतला जातो व पुन्हा त्यांची पायपीट सुरू होते, अशी त्यांची दैनंदिनी आहे. याच वेळी त्या आपापल्या सुखदु:खाच्या देवाणघेवाणीचे आदान प्रदान करून एकमेकींचे सांत्वनही करतात. या सर्व संकटांवर मात करीत दररोज दहा किलोमीटरपेक्षा अधिक पायपीट करूनदेखील या महिलांना हवी तशी कमाई होत नाही. चार ते पाच जणांच्या कुटुंबांची जबाबदारी असलेल्या शकू वाडकर यांच्या मते महिनाभर कष्ट करून केवळ पाच हजार रुपयेच हाती लागतात. त्यात ग्राहकांकडून घेतलेले कपडे खराब निघाल्यास खोट खावी लागते. त्यामुळेही नुकसान सहन करावे लागून कमाईची रक्कम कमी होते. या उत्पन्नात कुटुंबाचे भागत नाही, त्यामुळे मुलांनाही काही ठिकाणी काम करावे लागते.
मुले शिक्षण घेऊन घराला हात भार लावीत आहेत. आमच्यापैकी काही जणींची मुले मोठी झाली असून ते वाहनचालक म्हणून या परिसरात काम करीत असल्याने आमच्या कुटुंबाला आधार मिळाला असल्याचेही त्या आर्वजून सांगतात. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी या सर्व गोष्टींवर मात करीत जीवन जगावेच लागते, असे मत नमिता बुडके यांनी व्यक्त केले आहे. तर शासनाने आमच्यासारख्यांना मदत करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.