मुंबईतील वडाळ्यात बीपीसीएलच्या पेट्रोल वाहिनीची गळती होऊन आग लागण्याची घटना रविवारी घडल्यानंतर उरणमध्येही तेल तसेच वायुगळती होण्याचा धोका असल्याने येथील सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.  अरबी समुद्रातील तेल विहिरीतून काढण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावर प्रक्रिया करणारा ओएनजीसीचा तेल शुद्धीकरण प्रकल्प उरणमध्ये उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात करोडो लिटर अतिज्वलनशील नाफ्ता, घरगुती वायू, पेट्रोल, डिझेल, केरोसिन यांची कच्च्या तेलातून वर्गवारी केली जाते. त्यानंतर त्याचा पुरवठा वाहिन्यांमार्फत केला जातो. याच  प्रकल्पापासून काही अंतरावर जेएनपीटी हे अशिया खंडातील सर्वात मोठे अत्याधुनिक बंदर आहे.  या बंदरातून केंद्र सरकारच्या तसेच खासगी तेल कंपन्यांसाठी आयात करण्यात येणाऱ्या पेट्रोलजन्य पदार्थाची साठवणूक बंदराशेजारीच टँक फार्म उभारून करण्यात आलेली आहे.  काही अंतरावर भारत पेट्रोलियमचे गॅसभरणा सयंत्र आहे. मागील अनेक वर्षांत ओएनजीसीमधून झालेल्या अतिज्वलनशील पदार्थाच्या गळतीमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काहींना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. तर जहाजातून पेट्रोलजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या तेलवाहिन्यांना छिद्र पाडून त्यातील ज्वलनशील डिझेल, नाफ्ता चोरीच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. इंडियन ऑइलच्या धुतूम येथील साठवणूक केंद्रातून होणाऱ्या तेल चोरीमुळे दुर्घटना होण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.    या संदर्भात उरणचे तहसीलदार नितीन चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता उरणमध्ये नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची समिती अस्तित्वात असून त्यांचे काम योग्यरीतीने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा पातळीवरून तालुक्यातील ज्वलनशील पदार्थाची साठवणूक करणाऱ्या प्रकल्पात दर वर्षी मॉकड्रिल करण्यात येतात. तसेच सुरक्षेची काळजी घेण्यासाठी या प्रकल्पांना वारंवार भेटी देऊन माहिती घेतली जाते, असे चव्हाण यांनी या वेळी सांगितले.