स्वदेशी ही वस्तू नसून ती एक भावना आहे. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या स्वदेशी चळवळीची भारताला आज खरी गरज आहे. भारतीयांनी भारतात निर्माण झालेल्या वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करावा. अन्यथा हा भारतदेश आर्थिक गुलामगिरीत जाईल, अशी भीती वाटते, असे मत माजी न्यायमूर्ती पद्मभूषण चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
श्वेता गानू संचालित ‘श्रेय प्रकाशन’ संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये पार पडला. यावेळी श्वेता गानू यांनी लिहिलेल्या ‘कर्तृत्वाची जेथे प्रचीती’ या पुस्तकाचे आणि ‘अनाकलनीय’ या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, अ‍ॅड. विलास जोशी, पितांबरी प्रॉडक्टस्चे रवींद्र प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात धर्माधिकारी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पाण्यात दगड टाकल्यानंतर ज्याप्रमाणे वलय निर्माण होते, त्याप्रमाणे लहान उद्योग मोठे झाले पाहिजेत. त्यामध्ये समाजातल्या लहान घटकांपासून मोठय़ा घटकांपर्यंत सर्वाचा सहभाग असावा, असे त्यांनी सांगितले. भारतामध्ये महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की, ज्याच्या नावामध्ये राष्ट्र हा शब्द आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काम करताना राष्ट्रीय भावनेतून काम झाले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सर्वत्र ‘मेक इन इंडिया’चा नारा सुरू असला तरी आपण ‘मेक इन महाराष्ट्र’ असा संकल्प सोडला पाहिजे, असे आवाहन डॉ. स्नेहलता देशमुख यांनी यावेळी केले.