बदलापुरातील संकल्प सेवा समितीच्या रक्तदान शिबिरात ५७७ दात्यांनी रक्तदान करत शहरात रक्त संकलित करण्याचा नवा विक्रमच केला. काका गोळे फाऊंडेशन, बदलापूर (पू.) येथे झालेल्या या रक्तदान शिबिराचा फायदा शहरातील १८ थॅलिसिमीयाग्रस्त मुलांना होणार आहे. या मुलांना संकल्प सेवा समितीने दत्तक घेतले असून पुढील वर्षभर त्यांना रक्त उपलब्ध करून देण्याची महत्त्वाची जबाबदारी संकल्पने उचलली आहे. त्यामुळे वर्षभर तरी त्यांच्या पालकांना रक्तासाठी वणवण करावी लागणार नाही. अशी माहिती आयोजक आशिष गोळे यांनी दिली.
संकल्प सेवा समिती गेली १२ वर्षे हे रक्तदान शिबीर आयोजित करत असून पहिल्या वर्षी अवघ्या ४५ बाटल्या रक्त जमा केल्यानंतर आता ५७७ बाटल्या जमा करण्यात संकल्पला यश आले आहे. सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत १७०० दात्यांनी रक्तदान केले असून ७०० रुग्णांना आजवर त्याचा लाभ मिळाला आहे. कल्याण येथील अप्रण रक्तपेढी व मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयाच्या सहाय्याने हे रक्तदान शिबीर यशस्वीपणे पार पडले आहे.