महापालिकेच्या मुख्यालयात व २४ वॉर्ड कार्यालयांत प्लास्टिक औषधालाही सापडणार नाही.. कारण प्लास्टिकला असलेली बंदी.. मात्र, शहराच्या रस्तोरस्ती, गटारांत, नाल्यांत प्लास्टिक तुडुंब भरून वाहात असते. तब्बल ३०० कोटी प्लास्टिकच्या पिशव्या मुंबईकर दरवर्षी रस्त्यावर फेकत असतात. प्लास्टिकच्या या भस्मासुराला आवर कसा घालायचा या विवंचनेत मुंबई महापालिका सापडली आहे.
पावसाळ्यापूर्वी करावी लागणारी नालेसफाईची मोहीम याहीवेळी शहरात राबवली जात आहे. मात्र, त्यात मुख्य अडथळा ठरत आहेत प्लास्टिकच्या पिशव्या. मुंबईच्या सर्वच नाल्यांमध्ये प्लास्टिक पिशव्या व त्यामुळे अडकलेल्या कचऱ्यामुळे पालिका अधिकारी हैराण झाले आहेत. नालेसफाईची पाहणी करून आलेल्या आयुक्त सीताराम कुंटे यांनाही प्लास्टिकच्या पिशव्यांच्या उग्र प्रश्नाला कसे सामोरे जावे त्याचा पेच पडला आहे. पालिकेच्या अधिकारयांचा गट स्वच्छ मुंबई अभियानाची पाहणी करण्यासाठी पाठवला जाणार असला तरी प्लास्टिकच्या वाढत्या पिशव्यांचे काय करायचे याचा रामबाण उपाय पालिकेला सापडलेला नाही.
टाटा पॉवरने अलीकडेच चेंबूर येथे प्लास्टिकमुक्ती अभियान सुरू केले. त्याअंतर्गत हजारो कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. मात्र, याआधी महापालिकेने सुरू केलेल्या अभियानांमधून तात्पुरत्या प्रभावाव्यतिरिक्त फारसे काही घडलेले नाही. दरवर्षी ३०० कोटी पिशव्या कचऱ्यात जातात, अशी माहिती पालिकेच्या घनकचरा विभागातील विशेष कार्य अधिकारी सुभाष दळवी यांनी दिली. कचरावेचक रिसायकिलग होणारे प्लास्टिक उचलत असले तरी पिशव्या मात्र कचऱ्यातून डिम्पग ग्राउंडवर पोहोचतात. प्लास्टिक पिशव्यांचा हा कचरा रस्त्यावर, गटारात, नाल्यांमध्ये अडकतो आणि त्याची फळे मुंबईकरांना मुख्यत्वे पावसाळ्यात भोगावी लागतात.
शुभा राऊळ महापौर असताना पालिकेने प्लास्टिक पिशव्यांविरोधातील मोहीम तीव्र केली होती. मात्र दहा वर्षांनंतरही प्लास्टिकच्या राक्षसाला आवर घातला आलेला नाही, हे त्या मान्य करतात. दुकानदार, भाजीवाले यांच्याकडून मिळणारया प्लास्टिक पिशव्यांपुरता हा प्रश्न मर्यादित नाही. आता दहिसरच्या शिवाजी नगर परिसरात फिरतानाही प्लास्टिक पिशव्यांचा राक्षस दिसत आहे. मात्र लोकांमध्ये जागृती निर्माण होत नाही, तोपर्यंत काहीच करता येणार नाही, असे नगरसेविका व माजी महापौर शुभा राऊळ म्हणाल्या.

प्लास्टिक कचऱ्याचे गणित
मुंबईतील कुटुंबांची संख्या : ३० लाख
प्रत्येक कुटुंबाकडून दरदिवशी किमान तीन पिशव्या कचऱ्यात फेकल्या जातात
म्हणजेच दरवर्षी रस्त्यावर फेकल्या जाणाऱ्या पिशव्यांची संख्या ३०० कोटी
दररोज गोळा होणारा कचरा साडेसात हजार टन
त्यापैकी ३० टक्के कचरा प्लास्टिकचा

यांचा समावेश जास्त
गुटख्याची पाकिटे, आईस्क्रीमची पाकिटे/कप, पेप्सीच्या पिशव्या, दुधाच्या पिशव्या