News Flash

रासायनिकपेक्षा नैसर्गिक रंगाची उधळण करा

धूलिवंदनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विविध रंगामध्ये घातक रासायनिक घटक मिसळले जातात.

| March 6, 2015 02:49 am

धूलिवंदनानिमित्त तयार करण्यात आलेल्या विविध रंगामध्ये घातक रासायनिक घटक मिसळले जातात. त्याचे शरीरावर व आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्यामुळे रंगाची उधळण करण्यासाठी खास नैसर्गिक रंगाचा वापर करा, रासायनिक रंगाचा वापर करू नका, असा सल्ला शहरातील त्वचारोग व नेत्ररोग तज्ज्ञांनी दिला आहे.
काळ बदलला तशी रंगपंचमी साजरी करण्याची पद्धतही बदलली. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगाची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. रासायनिक रंग म्हणजे धातू ऑक्सिडाईज करून किंवा औद्योगिक वापराचे रंग कमी प्रतीच्या तेलात मिसळून तयार केले असतात. कॉपर सल्फेटपासून हिरवा रंग तर क्रोमिअम आणि ग्रोमाईड यांच्या संयुगातून हिरवा रंग तयार करतात. लाल रंग मक्र्युरी सल्फाईड आणि चंदेरी रंग एल्युमिनिअम ब्रोमाईडपासून तयार करतात. काळा रंग लेड ऑक्साईडपासून तयार करतात. हे रंग चकचकीत दिसावे म्हणून त्यात आणखी रासायनिक द्रव्य मिसळतात. हे सर्व रंग विषारी असून त्यामुळे त्वचेला खाज सुटून त्यावर पुरळ उठतात. हे रंग अ‍ॅलर्जिक असून त्यामुळे केस गळणे, अंधत्व येण्याची शक्यता असते. तसेच कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) चर्मरोग तज्ज्ञ डॉ. आर.पी. सिंग यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
हे रंग धुवून काढताना वापरलेले पाणी तर दूषित होतेच पण पर्यावरणालाही धोका पोहोचतो. एवढेच नव्हे तर अंधत्व येण्याची शक्यता असते. विविध रंगामध्ये एॅस्बेस्टॉस भुकटी, खडूची पावडर किंवा सिलिका यांचा वापर केला जातो. असे रंग सुद्धा शरीरासाठी घातक असतात. अ‍ॅस्बेस्टॉसची भुटकी तर कर्करोगाला निमंत्रण देते. ती अगदी अल्प प्रमाणात आपल्या शरीरात उतींमध्ये शिरली तर कर्करोग होऊ शकतो. काही रंगात अल्कलाईन असते. ते डोळ्यात गेले तर अंधत्व येऊ शकते, असे मेडिकलमधील नेत्ररोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप कुमरे यांनी सांगितले. मॅलाचाईट ग्रीन नावाचा रंग वापरण्यास परवानगी नाही. तो चुकून वापरला तर कर्करोग होण्याची शक्यता असे. त्याबरोबरच हाडे, फुफ्फुसे किंवा डोळे खराब होण्याची भीती असते. उघडउघड विकल्या जाणाऱ्या रंगाच्या भुकटीत वाळू आणि स्टार्चची भेसळ केलेली असते. पिवळ्या रंगात ऑरामाईनचा वापर करतात. त्यामुळे यकृत तसेच मूत्रपिंडाचे विकार होतात आणि त्यांची वाढही खुंटते. असे रंग एकत्र मिसळवून उडवले गेले तर ते प्रकृतीला जास्तच घातक असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. रासायनिक रंगापासून होणारा त्रास आणि धोका विचारात घेता ग्राहकांनी वनस्पतीपासून तयार होणाऱ्या नैसर्गिक रंगाचा वापर करण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणवादी व सहयोग या संस्थेचे संयोजक डॉ. रवींद्र भुसारी यांनी व्यक्त केले.

रंग खेळताय, हे करा
० रंग खेळायला बाहेर जाण्यापूर्वी शरीराला खोबरेल तेल किंवा गोडतेल लावायला हवे.
० रंग खेळण्याच्या आधी केसांना तेल लावायला पाहिजे. त्यामुळे केसांना रंग लागणार नाही.
० ऑईल पेंट किंवा बाजारात मिळणारे रसायनयुक्त रंग वापरू नयेत. त्याऐवजी कोरडा गुलाल, हळद किंवा केशरी रंगाचा वापर करावा.
० गुलाबपाणी आणि मुलतानी माती एकत्र करून लावली तर रंगाच्या अ‍ॅलर्जीचा त्रास होत नाही.
० डोळ्यांची जळजळ होत असल्यास थंड पाण्याने धुवावे. यानंतरही जळजळ सरूच असल्यास थंड पाण्याच्या पट्टय़ा डोळ्यावर ठेवाव्यात.
० डोळ्याला इजा झाल्यास, शरीरावर खाज सुटल्यास किंवा अ‍ॅलर्जी झाल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2015 2:49 am

Web Title: use the natural color rather than chemical for skin and eye safety
टॅग : Holi
Next Stories
1 रंग माझा
2 धुळवडीला पाण्याची नासाडी टाळण्याचे आवाहन
3 शहरातील बांधकाम क्षेत्रात मंदी कायम
Just Now!
X