दुसऱ्याचे मन दुखावणारा एखादा संदेश तुम्ही आपल्या मैत्रिणीला पाठवला आणि त्याची तक्रार झाली तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते. एखाद्या छायाचित्रामुळे कुणाला लज्जास्पद वाटेल अशी कृती सोशल मीडियावरून केली तरी तुम्ही आरोपी ठरू शकता. अशा काही तरतुदी कायद्यात आहेत. कायद्यातील या तरतुदींचा उल्लेख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर उलगडताच विद्यार्थी चपापले. स्टेट बँक कस्तुरी प्लाझा शाखेच्या शाखाधिकारी उषा मजिठीया यांनी सोशल मीडियासंबंधी कोणती काळजी घ्यावी, यासंबंधी व्याख्यान दिले.
खंबाळपाडा येथील मंजुनाथ महाविद्यालयात सायबर क्राइम या विषयावर उषा मजिठीया यांचे व्याख्यान आयोजित केले होते. प्रा.अडिगल, संयोजक प्रा. वृंदा यादवाड, विद्यार्थी, विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होते. सायबर क्राइममुळे अनवधानाने केलेल्या चुका विद्यार्थ्यांना कशा आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करू शकतात याची सविस्तर माहिती मजिठीया यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर करताना आपल्या भवितव्याचा प्राधान्याने विचार करावा, असा सल्ला दिला.