कोणत्याही प्रकारच्या संगीतात उत्तम कामगिरी करण्याची इच्छा असलेल्यांनी पाया मजबूत करण्यासाठी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणे आवश्यक आहे, असे मत प्रसिद्ध तबलावादक आणि उस्ताद अल्लरखाँ यांचे पुत्र फजल कुरेशी यांनी व्यक्त केले. उस्ताद अल्लारखाँ यांच्या ९५ व्या जयंतीच्या निमित्ताने वांद्रे (पश्चिम) येथील सेंट अँड्रय़ूज सभागृह येथे २८ एप्रिल रोजी एका मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीच्या निमित्ताने फजल यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते.
शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम असेल तर पाश्र्वगायन, सुगम संगीत किंवा कोणत्याही प्रकारचे गायन आणि वाद्य वादन यात तुम्ही खूप भरीव काम करू शकता, असेही ते म्हणाले. लहानपणापासूनच तबल्याचे संस्कार कळत-नकळत झाले. आम्ही मुलांनी तबलाच शिकावा, अशी सक्ती आमच्यावर वडिलांनी कधीही केली नाही. तबला शिकण्यासाठी घरी येणारे विद्यार्थी आणि आम्ही यात कधीही भेदभाव केला नाही. सगळ्यांना सारख्याच पद्धतीने त्यांनी तबल्याचे धडे दिले, असेही कुरेशी यांनी सांगितले.
माझे बंधू झाकिर हुसेन यांचे तबल्याशी, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीशी आणि पं. शिवकुमार यांचे संतूरशी घट्ट नाते जोडले गेले आहे. नवीन पिढीही तबला हे वाद्य शिकण्यासाठी पुढे येत असल्याने तबला आणि तबला वादन कलेचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही कुरेशी यांनी व्यक्त केला.  
२८ एप्रिल रोजी होणाऱ्या ‘द जर्नी कंटिन्यूअस’ या कार्यक्रमात भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत आणि जाझ अशी आगळी मैफल रंगणार आहे. आपण स्वत: तबला आणि राकेश चौरसिया बासरी वादन करणार असून लुईस बँक व त्यांचे सहकारी जाझ संगीत प्रकार सादर करणार आहेत. वेगवेगळ्या संगीत प्रकारातील जुगलबंदी हे ही या कार्यक्रमाचे वैशिष्टय़ असणार असल्याचे फजल यांनी नमूद केले.