मुलीने जुजबी शिक्षण घेऊन घरातील धुणीभांडी करावीत. लग्न करून दिले की तिने सासरच्या मंडळींच्या इच्छेनुसार संसार करावा अशी सर्वसाधारण मानसिकता चाळ, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या कुटुंबांमध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येते. या मानसिकतेत काही सकारात्मक बदल घडावेत तसेच स्त्री-पुरुष समानतेचा धागा घट्ट व्हावा यासाठी ‘वाचा’ या सामाजिक संस्थेने डोंबिवलीजवळील पिसवली गावातील झोपडपट्टी भागातील मुलींना स्त्री-पुरुष समानतेचे धडे देण्यास सुरुवात केली आहे.
िलगभेद समानता याविषयीची जागृती करणे हे उद्दिष्ट ठरवून मुंबईतील सांताक्रूझ येथील ‘वाचा’ संस्थेतर्फे महाराष्ट्र, गुजरात भागात काम सुरू आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून शिळरोड, नेतिवली येथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पिसवली भागातील झोपडपट्टी भागात काम सुरू करण्यात आले आहे. मुलींमधील जाणिवा, जागरूकता, कौशल्य, नेतृत्व विकसित करणे. तसेच मुलगा-मुलगी समानतेचे शिक्षण देणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. घरामध्ये मुलगा, मुलगी असा भेद करण्यात येत असेल तर तो कसा चुकीचा आहे हे कुटुंबीयांना पटवून दिले जाते. मुलीने केवळ धुणीभांडी करून विवाह करून माहेरी जाणे नव्हे, तर मुलाएवढीच तीही सक्षमपणे काम करू शकते हे समाजाला तसेच कुटुंबाला समजायला हवे, असे मार्गदर्शन संस्थेतर्फे मुलींना केले जाते. या उपक्रमात मुलांनाही सहभागी करून घेतले जाते. पिसवली येथे १०० हून अधिक मुले-मुली या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत, असे कार्यकर्त्यां तिलोत्तमा थिटे यांनी सांगितले.
संस्थेच्या मेधाविनी नामजोशी, अमृता डे, सोनल शुक्ला, संपदा मिसाळ, पल्लवी भागवत, तिलोत्तमा थिटे यांच्या सहभागातून हे उपक्रम चालविले जातात. मुला-मुलींना एका व्यासपीठावर आणून त्यांच्यात चर्चा घडविणे, सामाजिक संदेश देणारी पथनाटय़े सादर करणे, मुलींना आत्मनिर्भरतेचे धडे देणे, दररोजची वर्तमानपत्रे, मासिकांचे वाचन करणे, वाचनालय, अभ्यासिकेचा नियमित वापर, पालकसभा, पोलीस, पत्रकार, सरकारी कार्यालये, बँकांना भेटी देणे असे विविधांगी मार्गदर्शन या गटाला प्रात्यक्षिकासह केले जाते, असे अमृता डे यांनी सांगितले.