‘ज्योतसे ज्योत मिलाते चलो’ या गीताची प्रचिती देत पाच हजार पणत्या प्रज्वलित करून वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सोमवारी दीपोत्सव साजरा करण्यात आला. वाळू तस्करांच्या हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या नगर येथील कोतवाल अनिल सोनवणे यांच्या पत्नी मनीषा सोनवणे यांना मदतीचा धनादेश आणि धान्य प्रदान करून सामाजिक कृतज्ञतेचाही दीप तेवत ठेवण्यात आला.  ‘वैकुंठ परिवार’तर्फे आयोजित दीपोत्सव कार्यक्रमामध्ये चिंचवड येथील समरसता गुरुकुलम संस्थेत शिक्षण घेत असलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांनी पणत्या प्रज्वलित करीत वैकुंठ स्मशानभूमी परिसर उजळून टाकला. ‘क्रिएटिव्ह फाउंडेशन’चे संदीप खर्डेकर, शिक्षण मंडळ सदस्या मंजूश्री खर्डेकर, माजी उपमहापौर सुरेश नाशिककर, महापालिका कामगार युनियनचे पदाधिकारी प्रकाश हुरकुडली, शीळवादक अप्पा कुलकर्णी, यमगरवाडी मित्र मंडळाचे राजू गिजरे, आरोग्य निरीक्षक किशोर एकल, वैकुंठ परिवारचे अध्यक्ष सुरेंद्र मोघे गुरुजी, गणपत घडसी, शेखर कोंढाळकर, प्रभाकर फाटक याप्रसंगी उपस्थित होते. मनीषा सोनवणे यांना पाच हजार रुपयांचा धनादेश, धान्य आणि साडी देऊन वैकुंठातील कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच भाऊबीज साजरी केली. मनीषा सोनवणे यांना शिक्षण मंडळामध्ये सेविकेची नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंजूश्री खर्डेकर यांनी सांगितले. तर, मनीषा यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलून त्यांचे पालकत्व स्वीकारणार असल्याची घोषणा संदीप खर्डेकर यांनी केली.