भंडारा जिल्ह्य़ातील गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेसह गडचिरोली जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या उपनद्याही फुगल्या आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याचा दाब वाढून पुलांवर पाणी चढल्याने आज सकाळपासूनच गडचिरोली-आरमोरी आणि गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
जिल्ह्य़ात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्यागत आहे. अशातच गोसीखुर्द धरणाचे ३३ दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आल्याने जिल्ह्य़ाच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्य़ातून वाहणाऱ्या कठाणी, पोटफोडी, गाढवी, गोविंदपूर नाला इत्याही नद्यांचे पाणी पुलांवर चढले आहे. गडचिरोलीजवळील कठाणी नदीच्या पुलावर ५ फूट पाणी चढल्याने गडचिरोली ते आरमोरी या मार्गावरील वाहतूक बंद आहे. त्यामुळे आरमोरीमार्गे नागपूर, वडसा, गोंदियाकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गाने नागपूरकडे जाणाऱ्या बसफेऱ्या पाथरी, सिंदेवाहीमार्गे वळवण्यात आल्या आहेत, तर गडचिरोली ते चामोर्शी मार्गावरील पोटफोडी नदी आणि गोविंदपूर नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या मार्गाने आलापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागडकडे जाणाऱ्या बसफेऱ्या आज सकाळी ९ वाजल्यापासून बंद झालेल्या आहेत. आज सकाळी संपलेल्या २४ तासात २९.१ मि.मी. च्या सरासरीने ३४९.२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

वाशीम जिल्ह्य़ात जनजीवन विस्कळीत
वाशीम- जिल्ह्य़ात सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल असून इतर खरीप पिकांसह फळबागा व भाजीपाल्यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात सोमवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सायंकाळपर्यंत हा पाऊस सुरूच होता. या पावसाने जिल्ह्य़ातील सर्व जलाशयातील साठय़ांमध्ये वाढ झाली असून जिल्ह्य़ातील मध्यम व लघु प्रकल्पही ‘ओव्हर फ्लो’ झाल्याचे वृत्त आहे. मंगरुळपीर व मानोरा तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आल्याने त्या भागातील बससेवा सोमवारी विस्कळीत झाली होती. जिल्ह्य़ात मंगळवारी पहाटेपर्यंत सर्वाधिक पाऊस मंगरुळपीर तालुक्यात ७७ मि.मी., कारंजा (लाड) तालुक्यात ४५ मि.मी., रिसोडमध्ये ४३.४० मि.मी., वाशीममध्ये ३७.२० मि.मी., मालेगावमध्ये ३४.६० मि.मी. आणि मानोरा तालुक्यात ३४ मि.मी. पाऊस झाला.