तालुक्यातील वाकीखापरी प्रकल्पाचे काम धरणग्रस्तांनी रोखल्याने त्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तहसील कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठक मागण्यांबाबत स्थानिक स्तरावर निर्णय न झाल्याने निष्फळ ठरली
पुनर्वसन व सिंचन प्रश्न मार्गी लागल्याखेरीज धरणाचे उर्वरित काम होऊ देणार नाही व थेंबभरही पाणी अडवू देणार नाही, अशी संतप्त भूमिका धरणग्रस्तांनी घेतली. धरणाच्या बांधकामाची स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाल्याची माहिती धरणग्रस्तांचे नेते अ‍ॅड. रतनकुमार ईचम यांनी दिली. विशेष भूसंपादन अधिकारी व्ही. एन. अहिरे, तहसीलदार गोविंद शिंदे यांच्यासह अ‍ॅड. इचम, काशिनाथ गातवे, ढवळू ठोंबरे, हे बैठकीस उपस्थित होते. बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून मंत्रालयात या मागण्यांबाबत विचार विनीमय करण्यासाठी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
धरणग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये धरणक्षेत्रातील सर्व गावांचे पुनर्वसन होवून सुविधा पूर्ण व्हाव्यात, शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना पूर्ण करून द्याव्यात, खास बाब म्हणून मंजूर झालेले भावलीच्या पुनर्वसनाचे काम मार्गी लागावे, धरणग्रस्तांना सिंचनासाठी १० टक्के पाणी आरक्षित असावे, आदी मागण्यांचा समावेश आहे.