व्हॅलेन्टाईन डे येतो आणि जातो.. व्हॅलेन्टाईन डेची प्रथा सुरू होण्याच्या आधीही लोक प्रेमात पडत होतेच.. तरीही आज तरुणाई त्याची उत्सुकतेने वाट आहे.
व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेम दिवस अखेर तीन दिवसांवर येऊन थडकला आहे. बाजारही विविध आकर्षक भट वस्तूंनी सजला असून युवक-युवतींची खरेदी सुरू झाली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीपासूनच या सेलिब्रेशनसाठी आखलेल्या योजनेला मूर्त रूप देण्याचा हा दिवस. सर्वत्र सेलिब्रेशनचा माहोल बघून तरुणाईच काय तर, विवाहबंधनात अडकलेली जोडपीसुद्धा सेलिब्रेशनसाठी बाहेर पडली नाही तर नवलच!
अगदी नेम धरून कुणी ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रेमात पडत नाही, तरीही वर्षभर त्याची तयारी सुरूअसते. व्हॅलेन्टाईन डेचा रंग सध्या अवघ्या शहरावरच चढलेला दिसून येत आहे आणि याला कारणही तसेच आहे. लाल रंगाची फुले, लाल रंगाचे गिफ्ट याला अधिक महत्त्व असल्यामुळे गिफ्ट आर्टिकल्सची सारी दुकाने लाल रंगात न्हाऊन निघाली आहेत. त्यामुळे साहाजिकच नागपूरसह विदर्भावरही प्रेमाचे प्रतीक असलेल्या या रंगाची ‘उधळण’ बघायला मिळत आहे. व्हॅलेन्टाईन डे तीन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना  ‘त्याच्या’ आणि ‘तिच्या’साठी काय घ्यायचे यातच गोंधळलेली तरुणाई लक्ष्मीभवन चौक, सदर या परिसरात दिसून आली. काही ठिकाणी हॉटेलिंग, पिक्चर्सचे प्लॅनिंग यावर चर्चा सुरू होती. प्रेमात प्रत्येकच दिवस निराळा असतो, पण व्हॅलेंटाईन डे ची बातच काही और असते. वेगळे काही करण्याचा ‘त्याचा’ आणि ‘तिचा’ही प्रयत्न असतो म्हणूनच आदल्या दिवशीपर्यंत सेलिब्रेशनसाठी प्लॅन आखले जात असल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळाले. इतरांपेक्षा वेगळे कसे दिसायचे, भेटवस्तूचे पॅकिंग वेगळे कसे करायचे हेही शेवटपर्यंत ठरले नव्हते. अशीच काहीशी स्थिती व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशनचे आयोजन करणाऱ्या हॉटेल्सचीसुद्धा झाली आहे. शहरातील हॉटेल्सही यासाठी सज्ज असून त्यांनी वेगवेगळे पॅकेज घोषित केले आहे. तरुणाईच नव्हे तर विवाहबंधनात अडकलेल्या जोडप्यांनीसुद्धा हॉटेल्समध्ये शहरातील विविध हॉटेलमध्ये बुकिंग केले आहे. कॅन्डल लाईट डिनरचा आस्वाद फक्त हॉटेल्समधूनच घेता येतो हे जाणूनच हॉटेल्समध्ये त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आईस्क्रीम, पेस्ट्री, चॉकलेट्सवर वेगवेगळय़ा ऑफर जाहीर करणारे हॉटेलमालक आणखी काही वेगळे करता येईल का याच्या तयारीत गुंतलेले आहेत.