अखेर आम्ही व्हॅलेन्टाईन्स डेच्या दिवशी भेटलोच. मनात सॉलिडच आनंद होता. ती पण छान नटून आली होती. मीही तसा बरा गेलो होतो. आयुष्यात कधीही न पाय ठेवलेल्या आलिशान हॉटेलमध्ये आम्ही प्रवेश केला. माझ्या हातातील पिशवीत एका खास मत्रिणीने सुचविल्याप्रमाणे एक लाल फूल आणि एक गुलाबी अशी दोन फुलं होती. एक छोटी पेस्ट्री, पाच छोटे छोटे टेडीज असं सगळं गोष्टी होत्या. खरं तर तिला एक पेंडंट पण घ्यायचे होते. पण तिथे पसे घालवले असते तर हॉटेलचे बिल आजही तिलाच भरावे लागले असते. हॉटेलमध्ये पण मस्त व्हॅलेन्टाईन्स डेचं वातावरण होतं. एक गायक ‘सुरेल’ आवाजात गझल गात होता. खरं तर तो गायचा प्रयत्न करत होता. पण वातावरण अगदी व्हॅलेन्टाईन्स डेसाठी पोषक करण्यात तो यशस्वी झाला होता. कोपऱ्यातील एका टेबलवर आम्ही दोघेही बसलो. कॉलेजच्या गप्पा सुरू झाल्या. इतक्यात तिच्यासाठी फर्माईश पाठवलेलं गाणं सुरू झालं आणि हॉटेलमधील सारे आमच्याकडे पाहू लागले. इतकं छान वाटलं. मज्जाचं आली. तिलाही ते खूप आवडलं. आमची ऑर्डर आली म्हणून आम्ही खाण्याकडे लक्ष केंद्रित केलं. इतक्यात तिच्या चार मत्रिणी तिथे आल्या. मला काही कळलचं नाही. ती जागेवरून एकदम उठली आणि आनंदाने त्यांना म्हणू लागली, ‘बघा, मी दाखवलं ना करून. या व्हॅलेन्टाईन्स डेला मी डेटवर जाणार’, असं सांगितलं होतं ना. येस्स, मी जिंकले माझी पज. आता भरा आमचे बिल. मला काही कळेच ना.. माझा बावरा चेहरा पाहून ती म्हणाली, ‘भिडू, आपण पज लावली होती यांच्याबरोबर. तू मला लाईन देतोस म्हणून. या व्हॅलेन्टाईन्स डेला मी तुला घेऊन डेटला जाणार.’ कुल. आता आपण चांगले मित्र झालो. चल जेवून निघू या. तिच्या या निवेदनानंतर मलाही जेवण गोड आहे की तिखट हे कळलेच नाही. त्यांच्याबरोबर हसतहसत घास गिळत राहिलो. याहीवेळी नेहमीप्रमाणे ती नाहीच म्हणाली. तेही विचारायच्या आधीच.. असो, व्हॅलेन्टाईन्स डे तरी साजरा झाला. नशीब फुलं आणि पेस्ट्री वगैरे आधी दिली नाहीत ते.. शुभ व्हॅलेन्टाईन्स डे!