‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी तरुण व तरुणींसह ज्येष्ठ नागरिक सज्ज झाले आहे. या दिवसाचे समर्थन आणि विरोध करणारेही सरसावले आहेत. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवसेना प्रणीत विद्यार्थी सेनेने या दिनाचा विरोध केला असून राष्ट्रप्रेमी युवा दल आणि विदर्भ युथ कौन्सिलने तरुणांचा उत्साह वाढवण्यासाठी समर्थन केले आहे. विद्यार्थी सेना उद्या शनिवारी काळा दिवस पाळणार आहे.
विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे व्हॅलेटाईन डेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी सायंकाळी धंतोली परिसरातील गोरक्षण सभेतून उमेश प्रधान आणि राजकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ‘इशारा मिरवणूक’ काढण्यात आली. दीक्षाभूमी, लक्ष्मीनगर, शंकरनगर, लॉ कॉलेज, फुटाळा तलाव, जीपीओ चौक, महाराजबाग, व्हेरायटी चौक या मार्गाने फिरून आलेल्या या मिरवणुकीचा समारोप सीताबर्डीतील मुंजे चौकात झाला. ‘व्हॅलेंटाईन डे’ ला तरुण व तरुणी रस्त्यावर किंवा उद्यानात फिरताना दिसल्यास त्यांच्यावर परिषद आणि बजरंग  दलाच्या कार्यकर्त्यांची करडी नजर राहणार आहे.
पाश्चात्य संस्कृतीचे लांगुलचालन करण्याला विरोध करणे गरजेचे आहे. दुकानातील वस्तू विकण्यासाठी अशा दिवसाचे व्यापारीकरण करण्याऱ्या प्रवृत्ती प्रबळ होत आहेत. जग सर्वासाठी आहे आणि सर्व प्राणीमात्रांना जगण्याचा समान अधिकार असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. आज मात्र सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसून येतो. सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरातील तरुण व तरुणींना अशा अपप्रवृत्तींपासून सावध करावे, असे आवाहनही बजरंगदलाचे उमेश प्रधान यांनी केले. यावेळी श्रीकांत आगलावे, सुबोध आचार्य, राजकुमार शर्मा, निलेश टेकाडे, संकेत आंबेकर, शेखर घाटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. शिवसेना प्रणीत विद्यार्थी सेनेने प्रतीक बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी फुटाळा तलावजवळ व्हँलेटाईन डे साजरा करण्याचा निषेध केला.  दुसरीकडे व्हॅलेंटाईन डे साजरा करणाऱ्यांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तरुण व तरुणींना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रप्रेमी युवा दलाचे बाबा मेंढे यांनी केली आहे. सर्वानी बिनधास्तपणे हा दिवस साजरा करावा, असे आवाहन विदर्भ युथ कौन्सिलने व्हॅलेंटाईन डेचे समर्थन करताना केले आहे.
दरम्यान, उद्या ‘प्रेम दिनी’ पोलिसांची खास पथके गस्त घालणार असून रस्त्यांवर हिडीस प्रदर्शन आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. काही सामाजिक संघटनांनी व्हॅलेटाईन डेला केलेला विरोध बघता शहरातील उद्यान, जलाशये आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस तैनात राहणार आहेत. शहरातील उद्यानात प्रेमी युगलांची गर्दी गेल्या काही वर्षांपासून वाढत असून त्यांचे असभ्य वर्तन खुलेआम सुरू असतात. अशांना विरोध करण्यााठी बजरंग दल, शिवसेना आदी संघटना सरसावल्या आहेत. अशात तरुणांना मारहाण करण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अंबाझरी, फुटाळा तलाव, त्यामागील बॉटनिकल गार्डन, सेमिनरी हिल्स, गोरेवाडा तलाव व उद्यान, तसेच शहरातील विविध भागातील बागांमध्ये पोलीस तैनात राहतील. वेस्ट हायकोर्ट रोड, विशेषत: शंकर नगर चौक, लक्ष्मी भवन चौक, कॉफी हाऊस चौक, जी.एस. कॉलेज चौक, एलएडी महाविद्यालय चौक, सदर मेन रोड, प्रमुख मॉल्स, शहरातील विविध महाविद्यालये, मुलींची वसतिगृहे आदी ठिकाणी देखील पोलीस तैनात राहतील. शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक पोलीस लोखंडी कठडे लावणार असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.