सकाळी ठरल्याप्रमाणे वेळेत पोहोचलो. थोडा उशीर झाला असता तरी चालले असते. या पोरींना ना वेळेत येणं माहितीच नाही. दोन कटिंग पिऊन झाले. तरी हिचा पत्ता नव्हता. तब्बल अर्धा तास उशीरा!!! पण काय करणार. वाट पाहण्यावाचून मला इलाजच नव्हता. शेवटी खांद्यावर बॅग घेतलेली, डीपीमधील फोटोतील पांढरा टॉप आणि सुंदर असे हास्य घेऊन येत असताना ती दिसली आणि मी स्तब्धच झालो. ‘मोहबत्ते’ चित्रपटातील सीनप्रमाणे माझ्या अवतीभोवती व्हायोलीन वाजवणाऱ्या लोकांची गर्दी जमल्यासारखे वाटले. पण लवकरच भानावर आलो आणि ती समोर आल्यावर मीही स्मित दिलं. पाच मिनिटात आम्ही तिथून निघालो. त्यातील जेमतेम दोन मिनिटे आम्ही बोललो असू. पण माझ्या कॉलेजमधील पोरांनी मला तिच्या बरोबर पाहीलं हेच खूप झालं. आम्ही शांत असायचो तितका वेळ ती गाणं गुणगणायची. मी म्हटलं आवाज छान आहे. गाण शिकतेस का? तर म्हणे नाही. आई आणि भाऊ शिकतो. मी नुसतीच गाते. मी पण लगेचच म्हटलं. माझे पण बाबा पेटी वाजवतात. मी नुसताच सूर धरतो. म्हणजे आपली जोडी मस्त जमेल. तोंडातून निघालेल्या या वाक्यानंतर पसरलेली शांतता खूप भयाण होती. तिला राग आला की छान वाटलं काहीच कळत नव्हतं. पण संध्याकाळी परत भेटू, असं म्हणाली आणि तिच्या कॉलेजात गेली. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही भेटलो. खिशात पैसे घेऊन जाणे कुणाला माहितीच नाही. जेमतेम ५० रुपये होते. भेटल्यावर आईस्क्रीम खायचं म्हणून एका मोठय़ा आइस्क्रीम पार्लरमध्ये घेऊन गेली मला. आत जातानाच खिसा डोळय़ासमोर आला. पाकिटात फक्त ५० रुपये आणि त्या पार्लरमध्ये एका साध्या आईस्क्रीमच्या स्कूपची किंमत ५५ रुपये. म्हणजे मला एकटय़ाला खायचं म्हटलं तरी ते शक्य नव्हतं. पण आता इलाज नव्हता. एसीमध्ये घाम फुटला. कुठलं आईस्क्रीम खायचं या तिच्या प्रश्नाला ‘तू खाशील ते खाऊयात’ असं म्हटलं आणि तिनं ११० रुपयांचा एक असे दोन स्कूप ऑर्डर केले. गप्पा सुरू होत्या. पण माझं लक्ष कुठं होतं. मित्राला ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून पैसे घेऊन ये म्हटलं, तर त्याच्याकडेपण पैसे नाहीत. सगळीच बोंब. इतक्यात ती म्हणाली, ‘आजच्या आईस्क्रीमचे पैसे मी देणार.’ तिचे हे वाक्य ऐकल्यावर कसलं बरं वाटलं माहित्येय. खिसा लाख रुपयांनी भरल्यासारखं झालं. पण हा आनंद मी दाखवू शकलो नाही. जड अंतकरणाने एकदाच तिला म्हटलं की नको मी भरतो. ती राहू देत म्हणाली. मग मी चालेल म्हणून विषय संपवला. व्हॅलेंटाइन डेला भेटायचं तिनं मान्य केलं. आता गुलाबाची सोय. तेही २० रुपये.  
     नाथा कामत