व्हॅलेंटाईन डे आणि तरुणाईला येणारे उधाण हे समीकरण दिवसेंदिवस अधिक दृढ होत चालले आहे. हा दिवस दरवर्षीच ठरल्याप्रमाणे १४ फेब्रुवारीला येतो. कोणतीही प्रिय व्यक्ती व्हॅलेंटाईन असू शकते. व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दरवर्षीच नवखेपणा आणला जातो. व्हॅलेंटाईनच्या डिजिटल अवताराने केव्हाच तरुणाईला भूरळ पाडली आहे. व्हॅलेंटाईनला खास भेटवस्तू देऊन प्रभावित करण्याचा प्रयत्न असतो. या भेटवस्तूंमध्ये कपडे, दागदागिने, भेटकार्ड आणि पुष्पगुच्छ देण्याचा प्रघात सार्वत्रिक दिसून येतो. एसएमएस, एमएमएस, ईमेलच्या माध्यमातून व्हॅलेंटाईनला संदेश सहज पाठवण्यास तरुणाईचाच नव्हे तर जवळपास सर्वानाच हौस असते. हे माध्यम जास्त सोयीचे आणि समाधानकारक असल्याने कदाचित इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी या माध्यमांची अॅडव्हान्स रूपे बाजारात आणली आहेत. म्हणजे प्रिय व्यक्तीला अशा काही वस्तू द्यायच्या की ज्या आकर्षक, हटके आणि हाताळण्यास सोप्या राहतील, अशी शक्कल कंपन्यांनी लढवली आणि या वस्तू बाजारात आणल्या. अर्थात उच्च मध्यमवर्गामध्ये या वस्तू जास्त प्रचलित आहेत.
ब्रिटिश कंपनीने ‘मिक्स टॅप युएसबी’ बाजारात आणले आहे. कॅसेटच्या आकाराच्या या युएसबीद्वारे गाण्यांचा खजिना व्हॅलेंटाईनला ऐकवणे सोपे झाले. मोबाईलमध्येही ही सुविधा असली तरी त्यास मर्यादा आहेत. म्हणून ‘मिक्स टॅप युएसबी’च्या रूपात व्हॅलेंटाईनला देण्यासाठी भेटवस्तू बाजारात आणली आहे. प्रिंटर म्हटले की भला मोठा एक बॉक्स आठवतो. त्यानंतर त्याचा आकार लहान होत गेला. एलजी कंपनीने तर ‘पॉकेट फोटो प्रिंटर’ बाजारात आणून आश्चर्याचा धक्काच दिला. हाताच्या आकाराचे हे प्रिंटर असून भेटवस्तू म्हणून तरुणाईला ते पसंत पडेल, असे कंपनीला वाटत असल्यानेच व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर ते बाजारात आणले आहे. याशिवाय ‘थिंकसाउंड ऑन वन’ हे वेगवेगळ्या संगीताचा आनंद देणारे एक उपकरण आहे. मायक्रोफोनसारखा या उपकरणाचा वापर होऊ शकतो. नैसर्गिक लाकडापासून बनलेल्या या उपकरणामुळे नाद मधुर स्वरांची निर्मिती होऊन आवाजातील अनावश्यक अडथळ्यांवर मात केली जाते. शिवाय ध्वनी प्रदूषणापासून कोसो दूर असलेले हे उपकरण वापरण्यास समाधानकारक, एकच बटन असलेले आहे.
अर्थात व्हॅलेंटाईनला आनंद देणाऱ्या या सर्व भेटवस्तू हजारोंच्या घरात, महागडय़ा आहेत. मात्र, व्हॅलेंटाईनसाठी काहीही करायला तयार असलेल्या तरुणाई अशाप्रसंगी पैशाला किंमत देत नाही. आवडेल, परवडेल अशा किमतीची वस्तू घेण्याचाही बहुतेकांचा कल असतो. नागपुरातील व्हॅलेंटाईन डेने महापालिकेच्या सीमारेषा ओलांडल्या आहेत. अनेकजण नागपूरच्या बाहेरची हॉटेल्स, धाबा, रिसॉट या ठिकाणी व्हॅलेंटाईन दिन साजरा करतात. या डिजिटल काळात नागपूरकर कितपत डिजिटल आहेत हे डिजिटल वस्तूंच्या उलाढालीवरून कळेल.