रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिलेला सीव्हीएम कूपन्सचा पर्याय हद्दपार करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरवले आहे. ही सीव्हीएम कूपन्स मार्च २०१४ मध्ये हद्दपार होणार असली, तरी सध्या वापरात असलेल्या कूपन्समुळे प्रवासी बुचकळय़ात पडले आहेत. कारण सध्या विकण्यात येत असलेल्या ४० रुपयांच्या कूपन्सची मुदत डिसेंबर २०१२ मध्येच संपली आहे. त्यामुळे पैसे खर्च करून घेतलेले हे कूपन चालतील का की तिकिट तपासनीस त्यावरील मुदतीच्या तारखेवर बोट ठेवून आपल्याला दंडाची पावती फाडणार असा घोर प्रवाशांना लागला आहे.
रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर विकण्यात येत असलेल्या ४० रुपयांच्या कूपन पुस्तिकेवर या कूपन्सची वैधता डिसेंबर २०१२ पर्यंतच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. कूपन विकत घेऊन खिडकी सोडल्यानंतरच प्रवाशांच्या हे लक्षात येते.
त्यामुळे डिसेंबर २०१२ मध्ये मुदत संपलेल्या या कूपन्सचा वापर करून आपण प्रवास करू शकतो का, याबाबत या प्रवाशांच्या मनात संभ्रम आहे. तसे करणे अवैध असेल तर वर्षभरापूर्वीच वैधता संपलेल्या या कूपन पुस्तिका मध्य रेल्वे प्रवाशांना का विकत आहे? ही प्रवाशांची फसवणूक नाही का? असा सवाल सुबोध नाचणे या प्रवाशाने केला.
याबाबत मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, वैधता संपलेली कूपन्स टाकून देण्यापेक्षा ती वापरली जात आहेत. या कूपन्सची वैधता संपली असली, तरी तिकीट तपासनीस प्रवासासाठी ही कूपन्स ग्राह्य धरतात. त्यामुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येणार नाही, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हा प्रश्न फक्त ४० रुपयांच्या कूपन पुस्तिकेबाबत असून इतर पुस्तिकांवर तारखेची मुदत छापण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.